मुंबई महापालिकेतील निवडणुकीत दादर, घाटकोपर, प्रभादेवी, लालबाग, मुलुंड, वर्सोवा आणि मानखुर्दमधील उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली. मुंबईत शिवसेनेला ८४ आणि भाजपला ८२ जागांवर विजय मिळाला आहे. मुंबईच्या रणमैदानात शिवसेना-भाजपत निकालाचा ‘सामना’ पाहावयास मिळाला आहे. तर दुसरीकडे तगड्या उमेदवारांमध्येही अटीतटीची लढत रंगली.

दादर :
मराठीबहुल दादरमधील वॉर्ड क्रमांक १९१ मधील लढत मनसे आणि शिवसेनेने प्रतिष्ठेची केली होती. दादरचा गड जिंकण्यासाठी शिवसेनेने माजी महापौर आणि आमदारपद भुषविलेल्या विशाखा राऊत यांना रिंगणात उतरवले होते. तर मनसेकडून गटनेता संदीप देशपांडे यांच्या पत्नी स्वप्ना देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. सरकारी सेवेत उच्च पदावर असलेल्या देशपांडे यांनी नोकरीचा राजीनामा दिला होता. या वॉर्डात विशाखा राऊत विरूध्द देशपांडे अशी लढत झाली. अटीतटीच्या लढाईत शिवसेनेच्या विशाखा राऊत विजयी झाल्या आहेत. २०१२ च्या निवडणुकीत दादरमध्ये मनसेने शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले होते. त्यामुळे हा बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी शिवसेनेनं सगळी ताकद पणाला लावली होती.

घाटकोपर:
घाटकोपरमधील वॉर्ड क्रमांक १३२ मध्ये विरोधी पक्षनेता प्रवीण छेडा याचा पराभव झाला आहे. भाजपचे अब्जाधीश उमेदवार पराग शहा हे विजयी झाले आहेत. याठिकाणी
गुजराती समाजाची ९० टक्के वस्ती आहे. गुजराती मते निर्णायक असल्याने दोन्ही पक्षाने गुजराती समाजाचे उमेदवार दिले होते. खरा सामना हा छेडा विरूध्द शहा यांच्यात रंगला. विधानसभा निवडणुकीत या परिसरातून भाजप आघाडीवर होता. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपने यश मिळवले.

वर्सोवा :
वॉर्ड क्रमांक ६० मधून स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे याचा पराभव झाला आहे. काँग्रेसने नगरसेविका ज्येात्सना दिघे यांना रिंगणात उतरवले होते. त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. दोन्ही विद्यमान नगरसेवक आमने-सामने असल्याने वर्सोवात काँग्रेस आणि शिवसेनेत सरळ लढत होणार, असे चित्र होते. पण भाजपचे योगीराज दाभाडे यांनी अनपेक्षित मुसंडी मारून विजय मिळवला आहे. येथे दोन्हीही विद्यमान नगरसेवकांचा पराभव झाला.

प्रभादेवी :
शिवसेनेचा बालेकिल्ल्ला समजल्या जाणाऱ्या प्रभादेवीतील वॉर्ड क्रमांक १९४ मध्ये शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांचे चिरंजीव समाधान सरवणकर यांनी विजय मिळवला आहे. याठिकाणी शिवसेनेचे महेश सावंत यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे प्रभादेवीत शिवसेनेचा अंतर्गत सामना रंगला. मनसेचे विद्यमान नगरसेवक संतोष धुरी हे सुद्धा रिंगणात होते. मात्र खरा सामना शिवसेना आणि सावंत यांच्यात रंगला. अखेर सरवणकर यांना निसटता विजय मिळाला.

लालबाग:
लालबागमधून सेनेच्या सिंधू मसुरकर विजयी झाल्या. लालबाग-परळ हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सेनेच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक असलेले नाना आंबोले यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपमध्ये प्रवेश केला. वॉर्ड क्रमांक २०३ मधून भाजपने त्यांच्या पत्नी तेजस्विनी आंबोले यांना उमेदवारी दिली होती. तर त्यांच्या विरोधात शिवसेनेने सिंधू मसुरकर याना रिंगणात उतरवले होते. आंबोले आणि मसुरकर यांच्यात कडवी झुंज झाली.

मुलुंड:
शिवसेनेचे माजी सभागृह नेते प्रभाकर शिंदे यांनी शिवसेनेला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला होता. भाजपने त्यांना मुलुंड येथील वॉर्ड क्रमांक १०६ मधून निवडणूक रिंगणात उतरवले होते. त्याविरोधात शिवसेनेने अभिजित कदम हा तरुण उमेदवार उभा केला होता. या ठिकाणी शिवसेना आणि भाजपची तुल्यबळ लढाई झाली. मात्र शिंदे यांनी विजय मिळवला.

मानखुर्द:
वॉर्ड क्रमांक १४४ मध्ये शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात शिवसेनेतून भाजपत प्रवेश केलेले नगरसेवक दिनेश पांचाळ यांच्या पत्नी अनिता पांचाळ यांना रिंगणात उतरवले होते. त्यामुळे शेवाळे विरूध्द पांचाळ अशी कडवी झुंज येथे पाहावयास मिळाली. शेवाळे यांचा पराभव झाला असून पांचाळ निवडून आल्या आहेत.