मतदानाचा हक्क बजावण्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी ठिकठिकाणी रांगा लावल्या. सकाळी अनेक कलाकार मतदान केंद्रांवर हजर होते; मात्र काहींची नावे याद्यांमध्ये नव्हती. त्यामुळे समाजमाध्यमावर जाहीर नाराजी व्यक्त केली. अभिनेता वरुण धवनचे यादीत नाव नव्हते.

सलमान आणि शाहरुख खान यांनी वांद्रे येथील विभागांत मतदान केले. सुरक्षारक्षकांच्या गराडय़ात असलेल्या शाहरूखला पाहण्यासाठी मतदारांमध्ये काही काळ चढाओढ सुरू होती. आमिर खान मतदान करण्यासाठी आला नव्हता. मतदान करण्याचे आवाहन करणारा आमिर स्वत: मात्र मतदानाला हजर नव्हता, त्यामुळे अनेकांनी टीकेचा सूर लावला होता. त्याची पत्नी किरण राव हिने मतदानाचा हक्क बजावला. अनुष्का शर्मा हिने कलाकारांमध्ये प्रथम मतदान केले. रणवीर सिंग, अभिनेत्री रेखा यांनी मतदानासाठी उपस्थिती लावली. गीतकार गुलजार, दिग्दर्शक सुभाष घई, जॉन अब्राहम, श्रद्धा कपूर, दिग्दर्शक अयान मुखर्जी, झोया अख्तर, रेणुका शहाणे, मान्यता दत्त, ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांनी मतदान केले. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता श्रेयस तळपदे, भरत जाधव, दिग्दर्शक केदार शिंदे, दिग्दर्शक महेश कोठारे यांनीही आदिनाथ आणि सून ऊर्मिलासह मतदान केले. दिग्दर्शक परेश मोकाशी आणि लेखिका-अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, पुष्कर श्रोत्री, जयवंत वाडकर, आर्या आंबेगावकर, भारत गणेशपुरे, सुकन्या मोने कुलकर्णी, स्वाती चिटणीस, सुनील बर्वे, शर्वरी जमेनीस, श्रुती मराठे यांच्याबरोबरच ‘काहे दिया परदेस’ फेम गौरी म्हणजेच सायली संजीव आणि ‘खुलता कळी खुलेना’ मालिकेतील मयूरी देशमुख यांनीही सकाळी सकाळी मतदानाचा हक्कबजावला.

कलाकारांची समाजमाध्यमांवर नाराजी

मतदार याद्यांमध्ये नाव नसल्याने अनेक कलाकार मतदान करण्यापासून वंचित राहिले. अभिनेता वरुण धवनला त्याचे नाव यादीत नसल्याने मतदान करता आले नाही. त्याने या यादीत जर नाव मिळणार नसले तर ते कुठे मिळेल, असा प्रश्न निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना केला. मात्र त्यावर त्याला फारसे समाधानकारक उत्तर मिळाले नाही. सध्या ‘ती काय करते’च्या यशावर आरूढ असलेल्या दिग्दर्शक सतीश राजवाडेलाही मतदानाचा हक्क बजावता आला नाही. सतीशने यासाठी फेसबुकवर आपली कैफियत मांडली असून या प्रकारासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे. घरचा पत्ता बदललेला नाही, नावात बदल नाही, एक नागरिक म्हणून आमच्याकडून कोणतीही चूक नसताना केवळ आयोगाच्या अजब कारभाराचा फटका बसला असून ‘मतदान करा’ हे आवाहन करण्यापेक्षा याद्या व्यवस्थित करा, असेही त्याने सुनावले आहे. अभिनेता प्रसाद ओकलाही मतदान करता आले नाही.

यांनी मतदान केले नाही!

परदेश दौऱ्यावर असल्याने किंवा चित्रीकरणासाठी मुंबईबाहेर असल्याने अनेकांना मतदान करता आले नाही. यात प्रामुख्याने या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या ‘रंगून’ चित्रपटाची कलाकार जोडी कं गना राणावत आणि सैफ अली खान यांचा समावेश आहे. ‘भूमी’ या पदार्पणाच्या चित्रपटात व्यग्र असलेला संजय दत्तही आग्य्रात  असल्याने मतदान करू शकला नाही. प्रियांका चोप्रा सध्या हॉलीवूडमध्येच तंबू ठोकून आहे. तर अभिनेता अजय देवगण, इम्रान हाश्मी हे त्यांच्या आगामी ‘बादशाहो’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जोधपूर येथे गेले आहेत. याशिवाय, आमिर खान, हृतिक रोशन, अनुपम खेर, ऋषी कपूर, जावेद अख्तर व शबाना आझमी, अर्जुन कपूर, दिया मिर्झा आदी कलाकारही बाहेरगावी असल्याने मतदान करू शकले नाही.