उद्धव यांचा भाजपला प्रश्न; सुडाचे राजकारण सुरु असल्याचा आरोप

नागपूर महापालिकेतील घोटाळाप्रकरणी नंदलाल समितीने देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठपका ठेवला होता. मुंबई महापालिकेतील एकही शिवसेनेचा नगरसेवक घोटाळ्यात सापडलेला नाही. नालेसफाईत आम्ही घोटाळा केल्याचा आरोप केला जातो. मग उत्तर भारतातील ‘नमामि गंगा’ प्रकल्पात हजारो कोटी खर्च होऊनही गंगेचा एक थेंब पाणी शुद्ध झाले नाही. तो पैसा गेला कुठे, असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवरच गैरव्यवहारावरून तोफ डागली. आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यापूर्वी तुमचे मंत्री भ्रष्टाचारात किती बरबटले आहेत ते पाहा, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.

भाजपने प्रचारात शिवसेनेला गैरव्यवहार आणि पारदर्शकतेच्या मुद्दय़ावरून लक्ष्य केले होते. वांद्रे येथील बीकेसी मैदानावर महापालिका निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी याच मुद्दय़ावरून भाजपवर शाब्दिक हल्ला करताना मोदी आणि फडणवीस यांच्याबद्दल संशयाचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. मोदी पंतप्रधान झाल्यापासून सुडाचे राजकारण सुरू झाले आहे. ‘सामना’वर बंदीची मागणी करून तुमच्या मनातील ‘आणीबाणी’ बाहेर आली आहे.  ‘राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे’ हे मोदींना आता कुणीतरी सांगा. भाजपवाल्यांनी चरख्यावरून गांधींना उठवून मोदींना बसविले. उद्या हा देशही मोदींनी घडविल्याचे सांगायलाही ते कमी करणार नाहीत, असाही टोला त्यांनी हाणला.

काल-परवापर्यंत शरद पवार, अजित पवारांच्या विरोधात बोलत होतात. काका-पुतण्यांना गाडायला सांगत होतात. आता तुम्ही त्यांना पद्मविभूषण देता. पवारांचे बोट धरून आपण राजकारणात आल्याचे तुम्ही बारामतीत जाऊन सांगता. उद्या मुंबई महापालिकेत भाजपचे पानिपत झाल्यावर देवेंद्र फडणवीस तुम्ही मोदींचे कुठले बोट धरणार, असा सवाल त्यांनी केला.

पुण्याच्या सभेवरून चिमटा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुंडांना घेऊन भाजपचे परिवर्तन केले. भिवंडीत काँग्रेस गटनेत्याच्या हत्येत भाजपच्या उपाध्यक्षाचा हात असल्याचे सांगण्यात येते. सीसी टीव्हीमुळे सर्व सुरक्षित असल्याचा दावा मुख्यमंत्री करतात. हिंमत असेल तर या भाजपच्या या पदाधिकाऱ्याला पकडून दाखवा. तुमच्या थापांना लोक कंटाळले आहेत. म्हणूनच लोकांनी तुमच्या सभांकडे पाठ फिरविली. पुण्याची पारदर्शक सभा  साक्ष आहे. हजारो लोक पारदर्शकपणे बसले होते. म्हणून मुख्यमंत्र्यांना पारदर्शकपणे तेथून गायब व्हावे लागले.

पालिकेवर भगवा फडकल्यानंतर बाळासाहेब ठाकरे आरोग्य सेवा कवच योजनेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांकडून करून घेऊ. त्यात त्यांचे डोळे तपासून त्यांना चष्माही देऊ असा टोला लगावला.

राज यांना टोला

महापौर बंगला हडप करण्याचे आरोप करण्यात येत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रावरून टीका केली जात आहे. मग कशासाठी युतीसाठी हात पुढे केला होता, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता केला.