शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांवर थेट हल्ला; पैशांचा स्रोत जाहीर करण्याचे भाजपला आव्हान

महाराष्ट्र ज्यांना अद्याप नीट समजलेला नाही ते ‘हा माझा शब्द’ आणि ‘मी’पणा करीत आहेत. अटलबिहारी वाजपेयी किंवा लालकृष्ण अडवाणी यांच्या काळातही भाजपमध्ये एवढा ‘मीपणा’ कधीच नव्हता. मी मी म्हणणाऱ्यांचे पुढे काय होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शनिवारी जोरदार हल्ला चढविला. महापालिका निवडणुकीत मुंबईत भाजपचे वर्चस्व असणार नाही, असे स्पष्ट करून शिवसेनाच अव्वल राहील, असे भाकीत पवार यांनी केले.

राष्ट्रवादीच्या मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी भाजपवर जोरदार टीकाटिप्पणी करताना शिवसेनेबाबत सौम्य भूमिका घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मैत्रीचे संबंध असलेले पवार मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबाबत मात्र नेहमीच आक्रमक भूमिका घेतात, त्याचेच प्रत्यंतर पुन्हा आले. भाजपमध्ये सध्या अस्वस्थता आहे. कारण सध्या सारे वातावरण ‘मी’भोवती केंद्रित झाले आहे. पंतप्रधान मोदी यांनाही मुंबईत तेवढे स्थान देण्यात आलेले नाही. सारे काही ‘माझा शब्द’ यावरच केंद्रित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचा भर सध्या ‘पारदर्शक’ शब्दावर आहे. मुंबईतील फलकबाजी आणि एकूणच प्रचार बघितल्यावर भाजपकडे बरीच साधनसंपत्ती जमा झालेली दिसते. पैशांचा भरपूर वापर केला जात असल्याचे बघायला मिळते. यामुळेच पारदर्शक कारभाराची मागणी करणाऱ्या भाजपने एवढा पैसा आला कुठून याचा स्रोत जाहीर करणे आवश्यक आहे, अशी भूमिका पवार यांनी मांडली. ‘सामना’वर बंदी घालण्याच्या भाजपच्या मागणीस विरोध दर्शवीत ही सारी हुकूमशाहीकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने पडणारी पावले आहेत, अशी संभावना त्यांनी केली.

सेनेमुळे मुंबईत राष्ट्रवादीची वाढ खुंटली

राष्ट्रवादीला राज्यात मराठी भाषकांचा पाठिंबा मिळत गेला. मुंबईत आधीच शिवसेनेने मराठीचा मुद्दा हाती घेतलेला असल्याने राष्ट्रवादीला तेवढा पाठिंबा मिळाला नाही, अशी कबुली शरद पवार यांनी यावेळी दिली. भविष्यात मराठीसह अन्य भाषकांचा पाठिंबा मिळविण्याकरिता प्रयत्न केले जातील, असे पवार यांनी सांगितले. सर्व भाषकांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार करावे लागणार आहे. हे काम नक्कीच हाती घेतले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचा मध्यममार्ग

सत्तेतील या दोन्ही पक्षांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. राजीनामे खिशात आहेत, अशी शिवसेनेच्या मंत्र्यांकडून माहिती दिली जाते. तरीही शिवसेना सरकारमधून बाहेर पडण्याबाबत पवार यांनी साशंकता व्यक्त केली. कारण शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यास पाच वर्षे सरकारला पाठिंबा देण्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. उद्या सरकार वाचविण्याची वेळ आल्यास फडणवीस हे कर्जमाफी देऊन मोकळे होतील.

भाजपचा पाठिंबा देणार नाही

शिवसेनेने पाठिंबा काढलाच तर भाजप सरकारला राष्ट्रवादी पाठिंबा देणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले. पवार आपल्या भूमिकेवर ठाम राहतील का, अशी शंका ठाकरे यांनी व्यक्त केली आहे, याकडे पवार यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, आम्ही पाठिंबा देणार नाही, असे पत्र राज्यपालांना देण्यास तयार आहोत. पण पाठिंबा काढून घेत असल्याचे लेखी पत्र देण्याची शिवसेनेची तयारी आहे का, असा सवालही त्यांनी केला.