मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज, २३ केंद्रांमध्ये मोजणी

‘पारदर्शी’ कारभाराच्या मुद्दय़ावरून सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या लढाईत गेला महिनाभर मुंबईकरांचे ‘मनोरंजन’ करून मंगळवारी मतपरीक्षेला सामोरे गेलेल्या उमेदवारांचा निकाल आज, गुरुवारी लागणार आहे. मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांची मतमोजणी शहरातील २३ केंद्रांवर सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार असून सायंकाळी चापर्यंत देशाच्या आर्थिक राजधानीची सूत्रे कुणाच्या हाती असतील, याचे चित्र स्पष्ट होईल.

मुंबईतील ९१ लाख ८० हजार ४९१ मतदारांपैकी ५५.२८ टक्के मतदारांनी मंगळवारी आपला हक्क बजावून पालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या २२६७ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद केले आहे. ही यंत्रे गुरुवारी सकाळी दहा वाजता उघडतील आणि पुढील पाच वर्षे मुंबईवर कुणाचे राज्य असेल, याचा निर्णय होईल.

मुंबईतील २२७ प्रभागांमधील ७,३०४ मतदान केंद्रांवर मतदान पार पडले असून गुरुवारी २३ मतमोजणी केंद्रांमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये मतमोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणीला गुरुवारी सकाळी १० वाजता सुरुवात करण्यात येणार आहे. एका मतमोजणी केंद्रामध्ये मतमोजणीसाठी किमान १४ टेबल मांडण्यात येणार असून प्रत्येक टेबलवर दोन कर्मचारी आणि एका शिपायाची नियुक्ती करण्यात आली आहे. साधारण आठ ते १४ प्रभागांची मतमोजणी एका मतमोजणी केंद्रात करण्यात येणार आहे. एका प्रभागात सरासरी १० ते १५ मतदान केंद्रांचा समावेश होता.

मुंबईतील तब्बल ७,३०४ मतदान केंद्रांमध्ये ७,९९४ कंट्रोल युनिट, ९,२७९ मतयंत्रे आणि मेमरीयंत्रे उपलब्ध करण्यात आली होती. मतदान झाल्यानंतर मतयंत्रे व मेमरीयंत्रे सुरक्षितपणे मतमोजणी केंद्रात सीलबंद करून ठेवण्यात आली आहेत. प्रभागातील संबंधित उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींच्या समक्ष मतमोजणी केंद्रांमध्ये या यंत्रांचे सील काढून मतमोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणीची एक फेरी पूर्ण होण्यास साधारण २० मिनिटांचा अवधी लागेल असा अंदाज पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. एका प्रभागात मतमोजणीच्या अशा १२ ते १३ फेऱ्या होतील आणि त्यानंतर उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या आकडेवारीचा ताळेबंद करून निकाल जाहीर करण्यात येईल. साधारण दुपारी ३ वाजेपर्यंत कोणता पक्ष आघाडीवर असेल याचे चित्र कळू शकेल आणि सायंकाळी ४.३० ते ५च्या सुमारास संपूर्ण निकाल जाहीर होईल, असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.