महापौर बंगल्याच्या हस्तांतरासाठी शिवसेनेची धावपळ

पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मुंबईतील बदलती राजकीय समीकरणे लक्षात घेऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी निश्चित केलेला दादरमधील शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याचा भूखंड ‘बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक न्यासा’च्या ताब्यात देण्याची घाई शिवसेनेला झाली आहे. पालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तात्काळ तीन दिवसांनंतर होणाऱ्या पालिका सभागृहाच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजुरीला आणण्याची धावपळ सत्ताधारी शिवसेनेने सुरू केल्याचे समजते.

बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबईत स्मारक उभारण्यात यावे अशी शिवसैनिकांची मागणी होती. बाळासाहेबांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच जागी बाळासाहेबांचे स्मारक उभारावे, अशी मागणी शिवसैनिकांकडून करण्यात आली होती. मात्र तांत्रिक अडचणींमुळे हे स्मारक महापौर बंगल्याच्या जागेत उभारण्याचे निश्चित करण्यात आले. महापौर बंगल्याच्या ११,५५१.०१ चौरस मीटर जागेत बाळासाहेबांचे स्मारक उभारण्यावर शिक्कामोर्तब झाले. पालिका निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्यापूर्वी काही दिवस आधी प्रशासनाने महापौर बंगल्याचा भूखंड ‘बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक न्यास’ला हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीत सादर केला. भाजपचे नगरसेवक आणि सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी तात्काळ हा प्रस्ताव मंजूर करून टाकला. मात्र त्यानंतर तात्काळ आचारसंहिता जारी झाली. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेला पालिका सभागृहात या प्रस्तावाला मंजुरी देता आली नव्हती. आचारसंहिता जारी झाल्यामुळे शिवसेनेला सभागृहाची बैठक आयोजित करता आली नाही आणि त्यामुळे शिवसेनेवर नामुष्की ओढवली होती.

विद्यमान पालिका सभागृहाची मुदत ७ मार्च रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे याच पालिका सभागृहाच्या कार्यकाळात हा प्रस्ताव मंजूर करण्याची घाई शिवसेनेला लागली आहे. पालिका निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईत जारी झालेली आचारसंहिता २४ फेब्रुवारी रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे पालिका सभागृहाची फेब्रुवारी महिन्याची सभा येत्या २७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत हा प्रस्ताव मांडून त्याला मंजुरी देण्याचा शिवसेनेचा इरादा आहे.

व्हिपजारी करणार?

पालिका निवडणुकीमुळे गेल्या काही दिवसांत आयोजित करण्यात आलेल्या विविध समित्यांच्या बैठकांना नगरसेवकांची उपस्थिती अत्यंत तुरळक होती. त्यामुळे २७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या पालिका सभागृहात आवश्यक तेवढी सदस्य संख्या नसल्यास (कोरम) हा प्रस्ताव मंजूर होऊ शकणार नाही. त्यामुळे या बैठकीसाठी शिवसेनेकडून व्हिप जारी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक महापौर बंगल्याच्या जागेत उभारायचे आहे. भूखंड हस्तांतरणानंतर स्मारकाच्या कामाला सुरुवात होईल. माझ्या कारकीर्दीत या प्रस्तावाला मंजुरी मिळत असल्यामुळे आनंद होत आहे.

स्नेहल आंबेकर, महापौर