निकालाच्या आदल्या दिवशी उमेदवारांत धाकधूक

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान पार पडल्यानंतर गुरुवारी मतमोजणीत कोणाचा ‘निकाल’ लागणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. तर इलेक्ट्रॉनिक मतयंत्रात बंद असलेली मते नेमका कोणाच्या बाजूने कौल देणार याबद्दल सर्वच उमेदवारांच्या मनात बुधवारी धाकधूक सुरू आहे. असे असले तरी मतमोजणी केंद्रांमध्ये मतमोजणीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी आपल्या विश्वासातील कार्यकर्ते, समर्थकांची नियुक्ती करण्यात उमेदवार बुधवारी व्यग्र होते.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी २२७ प्रभागांमध्ये तब्बल २,२६७ उमेदवार रिंगणात उतरले होते. मंगळवारी पार पडलेल्या निवडणुकीत या उमेदवारांचे नशीब मतयंत्रात बंद झाले असून गुरुवारी मतमोजणी होत आहे. मतदानाच्या दिवशी आपल्या प्रभागातील मतदान केंद्रावर मतदान योग्य पद्धतीने सुरू असल्याची खातरजमा करण्यासाठी सर्वच पक्षाचे उमेदवार समर्थक आणि कार्यकर्त्यांसमवेत प्रभागात घिरटय़ा घालत होते. तसेच मतदानाच्या दिवशी आपल्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या व्यवस्थेकडेही त्यांना जातीने लक्ष द्यावे लागत होते. त्यामुळे त्यांची प्रचंड दमछाक झाली. मात्र मतदानाची वेळ उलटून गेल्यानंतर उमेदवारांनी नि:श्वास टाकला. बुधवारचा दिवस उजाडताच उमेदवारांना निकालाची धाकधूक जाणवू लागली. कोणत्या मतदान केंद्रात किती मते पडली याचा अंदाज बुधवारी दिवसभर घेत उमेदवार आपल्या कार्यालयात ठिय्या मांडून बसले होते. प्रभागातील निरनिराळ्या विभागातून किती मतदान झाले त्यावरून विजयाचे गणित जुळविण्यात उमेदवार आणि त्यांचे समर्थक व्यक्त होते. काही विभागात गुजराथी आणि अन्य भाषक मतदारांनी मोठय़ा संख्येने मतदान केल्याचे आढळून आल्यामुळे उमेदवार प्रचंड धास्तावल्याचे दिसत होते.

आधी प्रचार आता मोजणी

निवडणूक प्रक्रियेसाठी उमेदवारांनी  विश्वासातील काही कार्यकर्ते आणि समर्थकांवर महत्त्वाची कामगिरी दिली होती. उमेदवाराच्या अनुपस्थितीत या मंडळींनी मतदारांपर्यंत पोहोचून प्रचारचा धडाका लावला होता. आता त्यापैकी काही मंडळींची मतमोजणी केंद्रांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी संपेपर्यंत मतमोजणी केंद्र सोडायचे नाही, तसेच मतमोजणीची फेरी पूर्ण होताच हाती येणाऱ्या मतांच्या आकडेवारीची माहिती तात्काळ कळविण्याची सूचना त्यांना करण्यात आली आहे. काही मतमोजणी केंद्रांमध्ये उमेदवार स्वत: उपस्थित राहणार आहेत. मतमोजणीत कोणतीही गडबड होवू नये म्हणून उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांची फौज सज्ज ठेवण्यासाठी बुधवारी व्यूहरचना करीत होते. मात्र त्याचबरोबर प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून कोणत्या हालचाली करण्यात येत आहेत त्यावरही काही उमेदवार नजर ठेवून होते. असे असले तरी मतयंत्रात बंद झालेली मते कोणता कौल देणार याबाबत उमेदवारांच्या मनात धाकधूक सुरू होती.