निश्चलनीकरणाच्या निर्णयानंतर भाजपबद्दल नाराजी की पक्षाला पाठिंबा?

मतदानाच्या टक्केवारीत सरासरी दहा टक्के वाढ झालेली असली तरी शहराच्या उत्तर भागात गुजरातीबहुल मतदारसंघांमध्ये ही वाढ १३ टक्क्य़ांपर्यंत पोहोचली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत यावेळी गुजराती मतदारांमध्ये कोणतीही दर्शनी लाट दिसत नाही हे खरे आहे. परंतु, निश्चलनीकरणाच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करण्यासाठी गुजराती मतदार मतदानाकडे वळणार नाही, हा राजकीय विश्लेषकांचा अंदाज खोटा ठरला आहे. गुजराती मतदार भाजपच्या पाठिशी उभे राहतात की नाराजी व्यक्त केली, ते मात्र निकालानंतर कळेल.

मतदारयादीतून तब्बल दहा लाखांहून अधिक नावे कमी झाल्याने पाच वर्षांपूर्वीच्या निवडणुकीच्या तुलनेत मतदारांची संख्या वाढलेली नसूनही मतदानाच्या टक्क्य़ांमध्ये तब्बल १० टक्क्य़ांची सरासरी वाढ दिसत आहे. मात्र दहिसर, बोरीवली, कांदिवली तसेच मुलुंड, घाटकोपर या गुजरातीबहुल मतदारसंघात ही वाढ १३ टक्क्य़ांपर्यंत पोहोचली असल्याने या भागात अधिक मतदान झाल्याचे दिसत आहे. दोन वर्षांत ओसरलेली मोदी लाट आणि निश्चलनीकरणाचा बसलेला जोरदार फटका यामुळे गुजराती मतदार नाराजीने मतदानाकडे वळणार नसल्याचा कयास होता. मात्र मंगळवारी झालेल्या मतदानात गुजरातीबहुल मध्यमवर्गीय प्रभागांमध्ये मतदार केंद्रांमध्ये लागलेल्या रांगांनी हा अंदाज खोटा ठरवला. लोकसभा व विधानसभेवेळी गुजराती मतदारांची संख्या लक्षणीय दिसत होती. यावेळी त्या तुलनेत मतदारांची संख्या कमी असली तरी पालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी अनुत्साही असलेल्या गुजराती मतदारांची उपस्थिती लक्षात येण्यासारखी होती. दहिसर ते कांदिवली दरम्यान भाजपकडून सहा गुजराती उमेदवार उभे करण्यात आले आहेत. दक्षिण भागातील उच्चवर्गीय गुजराती मतदार मात्र या निवडणुकीत अनुत्साहीच राहिले.

gujrati-voters1

एकीकडे उत्तरेतील मतांचा टक्का वाढला असला तरी माहीम, दादर, नायगाव, शिवडी या मराठीबहुल परिसरातील मतदानाची टक्केवारी त्या तुलनेत वाढलेली नाही. जी दक्षिण व एफ दक्षिण विभागात सात टक्के मते वाढली आहेत. या भागात शिवसेना व काँग्रेसचा प्रभाव आहे. त्यावेळी कुर्ला, चांदिवली, वडाळा, अ‍ॅण्टॉप हिल, धारावी, भेंडीबाजार, क्रॉफर्ड मार्केट या परिसरातील मतदानाची टक्केवारीही १३ ते १६ टक्क्य़ांनी वाढली आहे. या भागात झोपडपट्टय़ांचे प्रमाण अधिक असून हा देखील शिवसेना व काँग्रेसचा प्रभाव असलेला परिसर आहे.