मुदत संपल्यानंतरही ‘ऑनलाइन’ प्रचार सुरूच ल्ल निवडणूक नियमांना सर्वच पक्षांकडून हरताळ

सर्वच राजकीय पक्षांनी सार्वजनिकरीत्या एकमेकांचे जाहीर वाभाडे काढून झाल्यानंतर रविवारी महापालिका निवडणुकांचा प्रचार खुल्या मदानापुरता संपला तरी वैयक्तिक पातळीवर संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम असलेल्या सोशल मीडियावर मात्र प्रचाराचा धुरळा अद्याप खाली बसलेला नाही. मतदानाच्या शेवटच्या घटकेपर्यंत हा प्रचार असाच सुरू राहणार असं चित्र सध्या दिसत आहे. प्रचारसभा, टीव्ही, जाहिरात, वर्तमानपत्र आणि पक्षाच्या व उमेदवारांच्या फेसबुक, ट्विटर पेजवरील प्रचारावर निवडणूक आयोगाची नजर असल्याने व्हॉट्स अप आणि खासगी सोशल मीडिया हॅन्डडलद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ट्विटर आणि फेसबुक पेजवरचा प्रचारही रविवारीच संपल्याचे दिसत होते. सोमवारी दिवसभरात या पेजवर निवडणुकीसंदर्भात एकही संदेश पोस्ट झाल्याचे पाहायला मिळाले नाही. मात्र, मुंबई काँग्रेसच्या ट्विटर पेजवर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, राजू वाघमारे यांचे प्रचारकी व्हिडीओ सोमवारी पोस्ट केल्याचे दिसले. त्याचप्रमाणे ‘अपना संकल्प’ या शीर्षकाच्या जाहिरातीसुद्धा टाकण्यात आलेल्या होत्या. ट्विटरसोबतच मुंबई काँग्रेसच्या फेसबुक पेजवरही व्हिडीओ आणि पोस्टरच्या माध्यमातून जोरदार प्रचार सुरू होता. मनसेच्या फेसबुक पेजवर राज आणि अमित ठाकरेंच्या वर्तमानपत्र आणि संकेतस्थळांना दिलेल्या मुलाखती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

भाजप महाराष्ट्र या फेसबुक पेजवर मतदारांना मतदानाचं आवाहन करताना असलेल्या पोस्टवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रे झळकत असून भाजपलाच मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर प्रोफाइल व्हिडीओ म्हणून अपलोड करण्यात आलेल्या मतदानचे आवाहन करणाऱ्या व्हिडीओमध्येही भाजपचे कमळ हे निवडणूक चिन्ह स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे मतदानाचे आवाहन करतानाच पक्षाचाही प्रचार करण्याची चलाखी भाजपने केल्याचे दिसतेय.

व्हॉट्स अप किंवा फेसबुक मेसेजेसमध्ये फिरणारे प्रचारकी संदेश आणि फोटोमध्ये मतदानाचे आवाहन करताना भाजप आणि शिवसेनेना एकमेकांवर चांगलेच तोंडसुख घेताना दिसत आहे. या निवडणूक प्रचारात परवलीचे ठरलेले ‘पारदर्शकता’ आणि ‘गाजर’ हे शब्द वापरून मतदारांना आपल्या बाजूने वाळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यंदाची निवडणूक मुख्यत्वे शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांवरच केंद्रित झाली होती. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीसुद्धा शेवटच्या आठवडय़ात प्रचाराचा धडाका लावला. तर काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे त्यांचे प्रमुख नेते प्रचारात फारसे दिसलेच नाहीत. राष्ट्रवादीलाही शरद पवारांचाच आसरा घ्यावा लागला. या सर्वाचा समाचार व्हॉट्सअ‍ॅपवर घेतला जात होता.