रणधुमाळी मध्य मुंबई

कुलाब्याच्या दांडीपासून वरळी, भायखळा, शिवडीपर्यंत पसरलेला हा लोकसभा मतदारसंघ. या लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसने अधिराज्य गाजविले. मुरली देवरा यांचा मतदारसंघ म्हणूनच दक्षिण मुंबईची ओळख बनली. या मतदारसंघात ठाकूरद्वार, गिरगाव, ग्रॅन्टरोड, वरळी, भायखळा, शिवडी परिसर मराठीबहुल आहे. काही विभागांमध्ये मुस्लीम टक्का, तर काही भागात अमराठी मतदारांची संख्या लक्षणीय आहे. अमराठी, मुस्लीम आणि काही मराठी मतांच्या जोरावर काँग्रेसने हा लोकसभा मतदारसंघ स्वत:कडे राखला होता.

१९८४ पासून २०१४ पर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये तीन वेळा अपवाद वगळल्यास या मतदारसंघावर देवरा कुटुंबाने आपली मोहर उमटविली होती. दक्षिण मुंबईतून मुरली देवरा चार वेळा, तर त्यांचे पुत्र मिलिंद देवरा दोन वेळा विजयी झाले होते. १९९६ आणि १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपच्या जयवंतीबेन मेहता यांनी मुलरी देवरा यांचा पराजय केला होता. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशभरात मोदी लाट उसळली होती. शिवसेनेच्या वाटय़ाला आलेल्या या मतदारसंघात अरविंद सावंत यांनी ३ लाख ७४ हजार ६०९ मते मिळवून मिलिंद देवरा यांचा पराभव केला.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये कुलाबा, मुंबादेवी, मलबार हिल, भायखळा, शिवडी आणि वरळी असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात.

कुलाबा विधानसभा मतदारसंघावर एकेकाळी काँग्रेसचे मर्झबान पात्रावाला यांची घट्ट पकड होती. त्यामुळे मुंबईतील काँग्रेसच्या गडांपैकी एक म्हणून कुलाबा ओळखला जात होता. परंतु मर्झबान पात्रावाला यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी दिलशा पात्रावाला यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि कुलाबा मतदारसंघ शिवसेनेनेजिंकला. त्यानंतर काँग्रेसच्या अ‍ॅनी शेखर यांना हा गड काबीज करण्यात यश आले. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपने कुलाबा मतदारसंघात आपला झेंडा फडकविला. भाजपचे राज के. पुरोहित या मतदारसंघात विजयी झाले.

संमिश्र मतदार असलेल्या मुंबादेवी मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व होते. १९८५ पासून सलग चार वर्षे भाजपचे राज के. पुरोहित या मतदारसंघातून निवडून येत होते. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारसंघांची फेररचना बदलली. काँग्रेसच्या अमिन पटेल यांनी २००९ मध्ये भाजपच्या गडाला खिंडार पाडले आणि विजयश्री खेचून आणली. भाजपचा सुरक्षित गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबादेवी मतदारसंघात अमिन पटेल यांनी २०१४ च्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसचा तिरंगा फडकविला.

एकेकाळी मलबार हिल मतदारसंघात काँग्रेसची मक्तेदारी होती. जनता पार्टीतून काँग्रेसमध्ये दाखल झालेले बी. ए. देसाई यांनी १९८० पासून सलग तीन वेळा झालेल्या निवडणुकीत विजयावर आपली मोहर उमटवली. बी. ए. देसाई यांच्यामुळे हा गड काँग्रेसला आपल्याकडे राखण्यात यश आले होते. मात्र १९९५ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे मंगलप्रभात लोढा यांनी हा मतदारसंघ काँग्रेसकडून काबीज केला.

२००९ मध्ये फेररचनेमध्ये ऑपेराहाऊस मतदारसंघ मलबार हिल मतदारसंघात विलीन झाला. त्यामुळे मलबार हिल मतदारसंघ शिवसेनेला मिळावा अशी स्थानिक रहिवाशांची मागणी होता. मात्र ‘मातोश्री’ने हा मतदारसंघ भाजपच्या झोळीत टाकला. आता मलबार हिल मतदारसंघावर भाजपचे मंगलप्रभात लोढा यांनी पकड घेतली असून १९९५ ते २०१४ पर्यंत झालेल्या सलग पाच निवडणुकांमध्ये ते या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. गिरगाव आणि अन्य काही भागात शिवसेनेचे प्राबल्य असताना स्थानिक शिवसैनिकांमधील वादामुळे आता हा मतदारसंघ भाजपच्या दृष्टीने अतिशय सुरक्षित बनला आहे.

एकेकाळी भायखळा मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र अखिल भारतीय सेनेचे अध्यक्ष अरुण गवळी यांनी काँग्रेसच्या मधु चव्हाण यांचा पराभव करीत काँग्रेसला धक्का दिला. मात्र २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत मधु चव्हाण यांनी आपला गड काबीज केला. परंतु काँग्रेसला २०१४ मध्ये हा गड राखता आला नाही.

सर्वच राजकीय पक्षांना धक्का बसेल असा निकाल २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात लागला. एएमआयएमचे वारीस पठाण यांच्या विजयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. या मतदारसंघातील मुस्लीम वस्त्यांमधून मोठय़ा प्रमाणावर झालेल्या मतदानाच्या बळावर ते निवडून आले. त्यामुळे पालिका निवडणुकीत येथील प्रभागात एएमआयएमच्या किती जागा निवडून येतील याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

कष्टकरी गिरणी कामगारांचे मोठय़ा प्रमाणावर अस्तित्व असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघात १९९० पर्यंत कोणत्याही एका राजकीय पक्षाचे वर्चस्व नव्हते. काँग्रेस, समाजवादी आणि कामगार आघाडीचे उमेदवार या मतदारसंघातून निवडून आले आहेत. मात्र १९९० मध्ये शिवसेनेचे दत्ताजी नलावडे यांनी हा मतदारसंघ जिंकला आणि त्यानंतर सलग चार वर्षे त्यांनी तो राखला. २००९ मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन अहिर यांनी शिवसेनेचा हा गड काबीज केला. मात्र २०१४ मध्ये शिवसेनेचे सुनील शिंदे यांनी सचिन अहिर यांचा पराभव करून हा बालेकिल्ला पुन्हा शिवसेनेला मिळवून दिला.

गिरणगावातील शिवडी मतदारसंघातील राजकीय समीकरणे प्रत्येक निवडणुकीत बदलत गेली. या मतदारसंघावर राजकीय पक्षांना मक्तेदारी मिळवता आली नाही. कधी अपक्ष उमेदवार, कधी काँग्रेस, तर कधी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या गळ्यात मतदारांनी विजयाची माळ घातली. या मतदारसंघातील मतदारांनी २००९ मध्ये मनसेच्या बाळा नांदगावकर यांच्या गळ्यात विजयश्रीची माळ घालून विधानसभेत पाठविले. तर २०१४ मधील निवडणुकीत शिवसेनेचे अजय चौधरी यांचा या मतदारसंघात विजय झाला. दक्षिण मुंबई परिसरात पालिकेचे साधारण ३४ प्रभाग असून शिवसेनेचे १३, भाजपचे ३, काँग्रेसचे १०, अ. भा. सेनेचे २, मनसेचे २, राष्ट्रवादी काँग्रेसचे २, समाजवादी पार्टीचा १, तर अपक्ष १ असे बलाबल आहे. ही आकडेवारी लक्षात घेता दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील काही भागांत शिवसेनेचे, तर काही भागांत काँग्रेसचे वर्चस्व आहे. भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी पालिका निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

चुरशीच्या लढती

* अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी आणि वंदना गवळी यांनी भायखळा परिसरातील अनुक्रमे २१२ आणि २०७ प्रभागातून निवडणूक लढवीत आहेत. मागील निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचा त्यांना पाठिंबा होता. त्यामुळे या दोघींच्या विरोधात युतीने उमेदवार उभे केले नव्हते. मात्र युती तुटल्यानंतर अ. भा. सेनेने शिवसेना आणि भाजप यांपैकी कोणत्याच पक्षाला पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी त्यांच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत. शिवसेना – भाजपचे आव्हान अ. भा. सेनेला पेलावे लागणार आहे.

*  गुढीपाडव्यानिमित्त गिरगावात काढण्यात येणाऱ्या स्वागतयात्रेवरून शिवसेना आणि रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांमध्ये वाद निर्माण झाला आहे. त्याचे पडसाद या निवडणुकीत उमटले असून रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांचा पाठिंबा असलेल्या डॉ. अनुराधा पोतदार यांना भाजपने प्रभाग २१८ मधून रिंगणात उतरविले आहे. तर दोन वेळा नगरसेविका झालेल्या मीनल जुवाटकर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. या दोघींमध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे.

*  भाजपचे आमदार राज के. पुरोहित यांचे पुत्र आकाश पुरोहित यांना भाजपने उमेदवारी दिली असून भाजपचे बंडखोर जनक संघवी यांना काँग्रेसने याच मतदारसंघातून रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे या दोघांमध्ये कडवी झुंज होण्याची चिन्हे आहेत.

* सेनेने सुरेंद्र बागलकर यांना प्रभाग क्रमांक २२० मधून उमेदवारी दिली आहे. भाजपचे अतुल शाह यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे. काँग्रेसतर्फे नरेशभाई सेठ, एएमआयएमतर्फे जिशान हमीद शेख निवडणूक लढवीत आहेत. मराठी, अमराठी आणि मुस्लीम असा मिश्र मतदारांचा हा प्रभाग आहे. मराठी आणि अमराठी मतांचे शिवसेना, भाजप व काँग्रेसमध्ये विभाजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुस्लीम मतदारांची मते मिळविण्यात यशस्वी होणाऱ्याच्या गळ्यात विजयाची माळ पडण्याची शक्यता आहे.