रणधुमाळी ईशान्य मुंबई

मराठी व गुजराती मतदारांचे प्राबल्य असलेल्या ईशान्य मुंबईत उमेदवारीवरून नाराजी, अस्वस्थता, छुप्या व उघड बंडखोरीचे वारे जोर धरून आहेत. त्यामुळे इथल्या ३९ पकी बहुतांश प्रभागांमध्ये चुरशीची, अटीतटीची लढत होईल आणि अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागू शकतील. यात काही तुल्यबळ उमेदवारांचा निसटता विजय किंवा थोडक्या मतांनी पराभवही अपेक्षित आहे.

ईशान्य मुंबईत भाजपचा खासदार आणि तीन आमदार आहेत. तर शिवसेनेचे दोन आणि समाजवादी पक्षाचा एक आमदार आहे. प्रत्यक्षात या मतदारसंघातील मुलुंड पूर्व, भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर पश्चिम ही मराठमोळी उपनगरे आहेत. पूर्वी त्यावर एकहाती शिवसेनेची सत्ता असे. मात्र सेनेतून फुटलेल्यानंतर ही उपनगरे राज ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. या भागांमधून पहिल्याच निवडणुकीत मनसेचे नगरसेवक मोठय़ा संख्येने निवडून आले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे ओळीत तीन आमदार निवडून आले. त्यामुळे शिवसेनेच्या अभेद्य किल्ल्याला भगदाड पडले. पण त्यानंतर राज ठाकरेंचा करिश्मा कमी झाला आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींकडून भरीव कामगिरी न झाल्याने मतदाराचा अपेक्षाभंग झाला. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेचा मतदार सेना व भाजपकडे वळला. परिणामी या भागातून तीनपकी एकही आमदार निवडून येऊ शकला नाही. त्यातल्या दोन जागा शिवसेने तर एक जागा मनसेतून भाजपमध्ये आलेल्या उमेदवाराने जिंकली. यंदाच्या लढतीत ईशान्य मुंबईतील चार ते पाच प्रभागांमध्येच मनसे प्रतिस्पर्धी सेना, भाजपशी दोन हात करू शकेल, अशी परिस्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाटेत वाहून गेलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीही फारशी वेगळी परिस्थिती नाही. फक्त दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ या समीकरणानुसार दोन्ही पक्षांच्या पारडयात काही ठिकाणी विजय पडलाच तर पडू शकेल. तात्पर्य हे की या मराठमोठय़ा प्रभागांमध्ये सेना, भाजप व मनसे उमेदवारांमध्ये मोठया प्रमाणात मतांची विभागणी अपेक्षित आहे. त्यामुळे पक्षापेक्षा वैयक्तिक पातळीवर मतदारांना आकर्षति करणारे उमेदवार विजयाची चव चाखू शकतील.

ईशान्य मुंबईत हाताच्या बोटांवर मोजण्या इतके प्रभाग वगळले तर सेना आणि भाजपात मुख्य लढत आहे. मुलुंड पश्चिमेकडील भाजपच्या हक्काच्या जागांवर गुजराती उमेदवार उतरवून शिवसेने लढती अटीतटीच्या केल्या आहेत. घाटकोपर पूर्वेकडील प्रभाग क्रमांक १३२ आणि १३१ हे भाजपचे हक्काचे मतदारसंघ आहेत. येथून अनुक्रमे पराग शहा आणि भालचंद्र शिरसाट भाजपचे तगडे उमेदवार रिंगणत आहेत. शहा जैन आहेत. शिवाय कोटय़धीश आहेत. या प्रभागात जैन समाज मोठय़ा संख्येने वास्तव्यास आहेत. याच प्रभागात जैन धर्मगुरू नम्रमुनी यांचा आश्रम आहे. शहा नम्रमुनींचे निकटवर्तीय, शिष्य आहेत. ही जागा आपल्या मुलाला मिळावी यासाठी भाजप आमदार व गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता प्रयत्नशील होते. पण त्यांनी माघार घेत शहा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. शहा यांना या प्रभागातून काँग्रेसचे गटनेते प्रवीण छेडा यांचे कडवे आव्हान आहे. प्रभागातील गारोडिया नगर या एकगठ्ठा गुजराती वसाहतीत छेडा यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये जोरदार कामे केली. शिवाय भाजपला पाडण्यासाठी येथील शिवसेना व अन्य विरोधी पक्षही छेडा यांना आयत्या वेळी छुपी मदत करू शकतात, या समीकरणाची जोरदार चर्चा प्रभागात आहे. तसेच प्रभाग क्रमांक १३१मध्ये जुनेजाणते शिरसाट निवडून येतील याची शाश्वती पक्षाला नाही. उमेदवारी न दिल्याने भाजप वॉर्ड अध्यक्ष अजय बागल आणि त्यांचे समर्थक अस्वस्थ आहेत. शिवाय छेडा यांना मदत केल्यास काँग्रेस शिरसाट यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी सेनेचे भानुशाली यांना छुपी मदत करू शकेल.

मनसेकडून परत घेतल्यानंतर विक्रोळीत सेनेची प्रचारात आघाडी पाहायला मिळाली. येथे मनसेतून भाजपत गेलेल्या माजी आमदार मंगेश सांगळे उमेदवार आहेत. त्यांच्यासमोर शिवसेनेच्या उपेंद्र सावंत यांचे आव्हान आहेच पण मनसेतून अधिकृत व बंडखोर अशा दोन उमेदवारांचाही अडथळा आहे. मुलुंडमधून सोमया यांचे चिरंजीव नील सोमया यांनाही विजयासाठी अटीतटीची झुंज द्यावी लागेल. त्यांच्यासमोर काँग्रेसचे बी. के. तिवारी, सेनेच्या मुकेश कारिया या गुजराती उमेदवाराचे आव्हान आहे. तसेच भाजप समर्थक गौतम गेमावत यांनीही बंडाचे निशाण फडकावल्याने सोमया यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. पालिकेच्या सुधार समितीचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या मीनाक्षी पाटील यांचे कडवे आव्हान असेल. मीनाक्षी या दिवंगत सुरेश बारकू पाटील यांच्या पत्नी आहेत. सुरेश यांचे अलीकडेच निधन झाल्याने या प्रभागातील सहानुभूती मीनाक्षी यांना मिळू शकेल. गटनेते मनोज कोटक यांचा प्रभाग (१०३) सुरक्षित आहे, असा दावा भाजपकडून केला जातो. प्रत्यक्षात फेररचनेमुळे या प्रभागात वाढलेला उत्तर भारतीय मतदार निर्णायक भूमिकेत आहे. शिवाय भाजपचे बंडखोर उमेदवार राकेश थवानी रिंगणात आहेत.

उमेदवाराचे व्यक्तिमत्व

भांडुपमध्ये प्रभाग क्रमांक ११४, ११५ येथे चुरशीच्या लढती होतील. ११४ मधून सेनेचे विद्यमान नगरसेवक रमेश कोरगावकर, मनसेच्या विद्यमान नगरसेविका अनिषा माझगावकर, भाजपचे मिलिंद कारेगावकर आणि राष्ट्रवादीचे विलास मर्गज रिंगणात आहेत. मतदार कोकणी आणि उमेदवारही त्यामुळे येथे चौरंगी लढत अपेक्षित आहे. ११५मध्ये भाजपचे ईशान्य मुंबई महामंत्री जितेंद्र घाडीगावकर, सेनेचे शाखाप्रमुख उमेश माने, मनसेच्या विद्यमान नगरसेविका वैष्णवी सरफरे-तारकर आणि मनसेचे बंडखोर अनील राजभोज रिंगणात आहेत. मात्र येथे खरी लढत सेना-भाजप अशीच होईल. प्रचार आणि स्थानिक समीकरणांवरून या प्रभागात भाजप सेनेला धक्का देण्याची शक्यता आहे. घाटकोपर पश्चिम मतदारसंघात बंडखोरी आणि उमेदवारीमुळे  कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळे सर्व पक्षांना फटका बसण्याची शक्यता आहे. तर मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघात एमआयएम आणि समाजवादी पक्षात काटे की टक्कर संभाव्य आहे. ईशान्य मुंबईत १५ जागांवर विजय मिळवू, असा दावा भाजपचे जिल्हा पदाधिकारी करतात. तर गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा जास्त नगरसेवक निवडून येतील, असा विश्वास सेनेकडून व्यक्त होतोय. प्रत्यक्षात इथले निकाल मतांची विभागणी, छुपी बंडखोरी, उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व यावर जास्त अवलंबून राहील.

प्रतिष्ठेच्या लढती

भाजप गटनेते मनोज कोटक (१०३), सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे (१०४), खासदार किरीट सोमया यांचे पुत्र नील (१०८), आमदार अशोक पाटील यांच्या पत्नी मीनाक्षी (११६), माजी आमदार मंगेश सांगळे (११८)

जयेश शिरसाट