मेट्रो प्रकल्पामुळे मराठी माणूस हद्दपार होईल-राज ठाकरे

ब्रिटिशांनी मुंबई घडवताना खुप दूरदृष्टी ठेवली होती आणि त्यामुळेच त्यांनी केलेली व्यवस्था शहर वसवल्यानंतर शेकडो वर्षांनीही पुरी पडत आहे. अशीच दूरदृष्टी आणि सौंदर्यदृष्टी ठेवून मुंबई घडवायची आहे, असे सांगत सत्ता मिळाल्यास मुंबईचा नगर विकास अत्यंत शास्त्रीय दृष्टीने करणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज यांनी निवडक पत्रकारांशी संवाद साधला. मनसेसमोरील आव्हाने, नाशिकमध्ये केलेली कामे, नाशिक आणि इतर भागांमध्ये पक्ष सोडून गेलेले पदाधिकारी, मुंबईच्या विकासाची दिशा, भाजपचा मुंबई तोडण्याचा डाव अशा विविध गोष्टींवर त्यांनी स्पष्ट मते मांडली.

‘कृष्णभुवन’ या आपल्या निवासस्थानी पांढराशुभ्र कुर्ता आणि तसाच पायजमा घालून राज  पत्रकारांना समारे गेले. . सुरुवातीला मुंबई, पुणे आणि नाशिक या तीनही शहरांमध्ये झालेल्या आपल्या सभा, सभांना मिळालेला प्रतिसाद, भाजप-सेना आदींच्या सभांना जमलेली गर्दी याबाबत राज यांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर प्रश्नोत्तरे सुरू झाली आणि राज ठाकरे यांनी प्रत्येक प्रश्नाला सणसणीत उत्तरे दिली.

ते लोक होते वेगळे..

नाशिकमध्ये मनसेने एवढी कामे करूनही तेथील आमदार व नगरसेवक पक्षाला का सोडून गेले, असे विचारताच राज यांनी त्या सर्वाना ‘खाण्या’ची संधी मिळाली नाही, असे सांगितले. नाशिक पालिकेच्या गेल्या पाच वर्षांच्या कारभारात एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही, हे बोलके आहे, असेही ते म्हणाले. पाच वर्षांपूर्वी माणसे निवडण्यात चूक झाली का, या प्रश्नाला मात्र त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. अशी माणसे ओळखता येत नाहीत, असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली.

ब्रिटिशांची दूरदृष्टी हवी!

मनसेने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला नसला, तरी सत्ता आली तर मुंबईत काय काय करणार, या प्रश्नाला उत्तर देताना राज यांनी ब्रिटिशांच्या दूरदृष्टीचा उल्लेख केला. ओव्हल, आझाद, शिवाजी पार्क ही भव्य मैदाने ब्रिटिशांच्या नगर विकासाचा भाग आहेत. उपनगरांमध्ये एक तरी मैदान दाखवून द्यावे, असे सांगत राज यांनी स्वातंत्र्यापासूनच्या पालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढायला सुरुवात केली. २६ जुलै रोजी उपनगरांमध्ये पाणी तुंबले, पण शहरात तेवढे पाणी तुंबले नाही. ब्रिटिशांनी बांधलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची इमारत आजही पुरी पडत आहे. अशा दूरदृष्टीने कामे व्हायला हवीत. आपली सत्ता आली, तर अशीच कामे होतील, असेही त्यांनी सांगितले.

‘कुंभ’ असला, तरी प्रगती पालिकेमुळेच

कुंभ मेळ्यासाठी केंद्राने निधी ओतून नाशिकमधील रस्ते चकाचक केल्याची टीका काही जण करत आहेत. पण कुंभ मेळ्यासाठी केंद्राने जाहीर केलेल्या ११०० कोटींपैकी ७०० कोटी रुपयांचाच निधी आला. उर्वरित ४५० कोटी रुपयांचा खर्च पालिकेने केला. तसेच निधी केंद्राने दिला, तरी रस्ते बांधण्याचे काम पालिकेनेच केले. पाच वर्षांमध्ये ११५० कोटी रुपयांच्या निधीमधून ५१० किमीचे रस्ते बांधून आणि उत्तम करून होत असतील, तर सेना-भाजपने मुंबईसाठीच्या ७५ हजार कोटींच्या निधीतून नेमके काय केले, असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला.

मेट्रो प्रकल्प मुंबई फोडण्यासाठीच!

भाजपने मेट्रोचे जाळे विणण्याची तयारी केली असली, तरी ही मेट्रो जाणाऱ्या भागांमध्ये जमिनींचे भाव भडकणार आहेत. त्यामुळे मराठी माणूस तेथून हद्दपार होणार आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या विरोधात असलेल्या विकासाला नेहमीच विरोध करेन, असे सांगत राज यांनी मेट्रो प्रकल्पांनाही विरोध असल्याचे सांगितले. गेल्या काही वर्षांपासून पद्धतशीरपणे आपले मतदारसंघ तयार करून परप्रांतियांनी मुंबईच्या राजकारणावर पकड मिळवण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत मराठी माणसाचा कैवार घेणारी शिवसेनाही आता तेच करू लागली आहे, असेही राज यांनी सांगितले.