राज ठाकरे यांच्या मतदारांना प्रश्न

‘एका बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिक महापालिकेत पाच वर्षांत केलेली कामे आहेत आणि दुसऱ्या बाजूला सेना-भाजप यांच्या पैशांच्या झगमगाटातील जाहिराती आहेत. केलेली कामे की पैसा यातून तुम्हाला निवड करायची आहे,’ असे आवाहन करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदारांकडे मतांचा जोगवा मागितला. शनिवारी दादरमधील कबुतरखान्याजवळ राज यांची सभा झाली. आपल्या तासाभराच्या भाषणात राज यांनी मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे या दोघांसह सेना-भाजपच्या कारभारावर टीका केली. मुख्यमंत्र्यांची पुण्यातील सभा हा तर पारदर्शक कारभाराचा उत्तम नमुना होता, इतका की नुसत्याच खुच्र्या दिसत होत्या, असा टोला लगावत राज यांनी पुढे मुख्यमंत्र्यांच्या नाशिकच्या सभेचीही रेवडी उडवली. नाशिक दत्तक घेणाऱ्या आणि शब्द वगरे देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आधी आपली खुर्ची घट्ट करावी, असा टोमणाही राज यांनी मारला. सध्या एकमेकांविरोधात गरळ ओकणारे हे दोन्ही पक्ष निवडणुकांनंतर पुन्हा एक होतील, असेही त्यांनी सांगितले. सभेच्या सुरुवातीलाच ही सभा होऊ नये, यासाठी सेनेने कसा आटापिटा केला, याचा दाखला राज यांनी दिला. मनसेची सभा दत्ता राऊळ मदानात होऊ नये, असा बंदोबस्त सेनेने केला होता. पण मनसेची सभा जिथे होईल, गर्दी तिथेच होते, असे सांगत राज यांनी जमलेल्या सर्व मतदारांचे आभार मानले.