शिवसेना पाठिंबा काढणार नाही ; रावसाहेब दानवे यांना विश्वास

निवडणुकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होतच असतात, पण शिवसेना सरकारचा पाठिंबा काढणार नाही, ही खात्री असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.  शिवसेनेला ‘थंड’ करून सरकार वाचविण्यासाठी भाजपकडून तहाच्या वाटाघाटी सुरू होण्याची शक्यता आहे.

राज्यातील महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचाराची सांगता रविवारी होत आहे. शिवसेना-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे मोठे वादळ उठले. ही ‘मिनी विधानसभा’ निवडणूक पार पडल्यावर सरकारसाठी धोक्याची घंटा वाजणार का, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘नोटीस कालावधी’नंतर काय, याविषयी चर्चा सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्याशी संपर्क साधला असता सरकारला कोणताही धोका नाही, शिवसेना पाठिंबा काढणारच नाही आणि हे सरकार शिवसेनेबरोबरच पाच वर्षे कार्यकाळ पूर्ण करेल, अशी ग्वाही दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शिवसेनेने पाठिंबा काढल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरकारला पाठिंबा दिला जाणार नाही, असे सांगितले आहे. याबाबत विचारता पवार यांच्या मनात काय आहे हे मला सांगता येणार नाही. पण शिवसेनेला सरकारमध्ये राहायचे आहे मुंबई महापालिकेत भाजपला स्वबळावरच सत्ता मिळेल आणि तरीही शिवसेना सरकारचा पाठिंबा काढणार नाही, असे दानवे यांनी सांगितले.

राज्य सरकारचा कारभार पारदर्शकच आहे. कोणालाही एखादा मंत्री, अधिकारी यांच्या संपत्तीबाबत काही आक्षेप असेल, तर त्यांनी मुख्यमंत्री किंवा न्यायालयात जावे, त्यांच्या संपत्तीची माहिती जाहीर करण्यात कोणतीही अडचण नाही. शिवसेनेचे राज्य सरकारचा कारभार पारदर्शक करण्याबाबत जे काही मुद्दे व सूचना असतील, त्यांचा जरूर विचार केला जाईल, असेही दानवे यांनी सांगितले.