उत्तर मध्य मुंबई

उत्तर, ईशान्य आणि दक्षिण मुंबईत दणदणीत विजय मिळवलेल्या भाजपला उत्तरमध्य लोकसभा मतदारसंघात मात्र ठसा उमटवता आला नाही. लोकसभेतील खासदार व मुंबई जिल्हा अध्यक्षांसह दोन आमदार असूनही या भागात भाजपला केवळ आठ जागा मिळवता आल्या. सेनेने या भागात १५ जागांवर भगवा फडकवला असून वांद्रे पश्चिमेकडील उच्चभ्रू वस्तीसह बेहरामपाडा, चांदिवली, कुर्ला या भागात काँग्रेसचे अस्तित्व टिकून राहिले. त्याचसोबत मनसे, राष्ट्रवादी, एमआयएम यांनाही या भागाने हात दिला.

पश्चिमेला उच्चभ्रू वर्ग, विलेपार्ले, सांताक्रूझ, खार पूर्वेचा मध्यमवर्गीय आणि चांदिवली, कुर्ला येथील झोपडपट्टी यांनी तयार झालेल्या मतदारसंघात फक्त तीन उमेदवार लढतीत उतरलेले मतदारसंघ होते तसेच शहरातील सर्वाधिक ३१ उमेदवार लढत असलेला मतदारसंघही होते. यावरून या विभागातील दोन टोके लक्षात येतील. या मतदारसंघातून भाजपच्या पूनम महाजन लोकसभेवर गेल्या होत्या. विलेपार्ले येथून भाजपचे पराग अळवणी, चांदिवली येथून काँग्रेसचे नसीम खान, कलिनामधून शिवसेनेचे संजय पोतनीस, वांद्रे पूर्वकडून सेनेच्या तृप्ती सावंत, वांद्रे पश्चिमेत भाजपचे आशीष शेलार तर कुर्ला येथून सेनेचे मंगेश कांबळे आमदार आहेत.

पाच वर्षांपूर्वी या भागातील ३६ पैकी शिवसेना १०, काँग्रेस ८, मनसे ६, भाजप ३, सप २, राष्ट्रवादी २ तर अपक्ष ५ ठिकाणी विजयी झाले होते. या निवडणुकीत शिवसेना १५, काँग्रेस ६, मनसे ३, भाजप ८, राष्ट्रवादी २ तर अपक्ष २ ठिकाणी निवडून आले. गेल्या निवडणुकीत अपक्ष म्हणून विजयी झालेल्या विलेपार्ले येथील ज्योती अळवणी व कुर्ला येथील लीना शुक्ला आता भाजपकडून तर राष्ट्रवादीच्या सविता पवार यांनी प्रभाग १५६ मध्ये सेनेकडून निवडणूक लढवली. यापैकी ज्योती अळवणी विजयी झाल्या तर लीना शुक्ला व सविता पवार यांचा पराभव झाला. अपक्ष म्हणून जिंकून आलेल्या विजय तांडेल यांच्या कुटुंबातून सान्वी तांडेल सेनेच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक १७१मधून विजयी झाल्या.

पक्षनिहाय नगरसेवक

शिवसेना : सदानंद परब, विश्वनाथ महाडेश्वर, सदानंद परब, दिनेश कुबल, सगुण नाईक, रोहिणी कांबळे, प्रज्ञा भूतकर, शेखर वायंगणकर, हाजी हलीम खान, संजय अलगदरे, आकांक्षा शेटय़े, चित्रा सांगळे, विजयेंद्र शिंदे, प्रवीण मोरजकर, सान्वी तांडेल.

भाजप :  ज्योती अळवणी, हेतल गाला, अलका केरकर, स्वप्ना म्हात्रे, प्रकाश मोरे, हरीश भादिर्गे, सुषमा सावंत, राजेश फुलवारिया.

काँग्रेस : अमिन कुट्टी, तुलिप मिरांडा, असिफ झकेरिया, वाजिद कुरेशी, अश्रफ आझमी, दिलशाद आझमी.

मनसे : अश्विनी माटेकर, दिलीप लांडे, विनोद अरगिले.

राष्ट्रवादी : सईदा खान, कप्तान मलिक.

एमआयएम : गुलझार कुरेशी.

अपक्ष : मुमताज खान, किरण लांडगे.

चुरशीच्या लढती

कुर्ला येथील प्रभाग क्रमांक १६८ मधून शिवसेनेच्या नगरसेवक डॉ. अनुराधा पेडणेकर व राष्ट्रवादीच्या नगरसेवक डॉ. सईदा खान लढतीत उतरल्या होत्या. या लढतीत डॉ. खान विजयी झाल्या. प्रभाग १६६ मधून सेनेच्या विद्यमान नगरसेवक मनाली तुळसकर यांना मनसेच्या विनोद अरगिले यांनी हरवले, तर १७० मध्ये उभ्या राहिलेल्या सेना नगरसेवक दर्शना शिंदे यांना राष्ट्रवादीचे कप्तान मलिक यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. सांताक्रूझमधून शिवसेनेचे माजी नगरसेवक विश्वनाथ महाडेश्वर आणि भाजपचे विद्यमान नगरसेवक महेश पारकर रिंगणात होते. महाडेश्वर यांनी ही जागा सेनेला मिळवून दिली.