युती न केल्यास शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपची व्यूहरचना

मुंबईत जर शिवसेनेने युतीसाठी ‘सन्मानपूर्वक’ प्रस्ताव दिला नाही, तर राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महापाालिका व जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडणुकीत शिवसेनेला कोणत्याही प्रकारे साथ न करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. शिवसेनेची कोंडी करण्यासाठी राजकीय व्यूहरचना करण्यात येत आहे. मुंबईत आकडय़ांचे गणित जमत नसल्याने ‘भाजपचाच महापौर होणार,’ या दाव्याबाबत नेत्यांकडून तूर्तास ‘मौनीनीती’ बाळगली जात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी पक्षाच्या विजयी मेळाव्यातही याबाबतचे वक्तव्य जाणीवपूर्वक टाळले.

भाजपचा काँग्रेसबरोबर कोणताही समझोता मुंबईत शक्य नसून शिवसेनेकडून मात्र तसा प्रयत्न होत आहे. उत्तरप्रदेशच्या निवडणुकीतील शेवटचे मतदान आठ मार्चला झाल्यावर महापौरपदाची निवडणूक होणार आहे. शिवसेनेला जाहीर पाठिंबा देणे काँग्रेसला तोपर्यंत कठीण असल्याने शिवसेनेच्या बाजूने मतदान करून किंवा मतदानास अनुपस्थित राहून मदत करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. काँग्रेसने अनुपस्थित राहून मदत केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, एमआयएम व अपक्षांची मते महत्त्वाची ठरतील. त्यांच्यापैकीही काहीजणांनी अनुपस्थित राहून मदत केली, तर शिवसेना व भाजप उमेदवारातच लढत होईल. त्यादृष्टीने शिवसेना व भाजपकडून रणनीती आखली जात असून पाठिंब्याचे छुपे प्रयत्न सुरू आहेत. मात्र पाठिंब्याची खात्री नसल्याने व आकडय़ांचे गणित न जुळल्याने मुख्यमंत्री, शेलार व अन्य नेत्यांनी मुंबईत भाजपचाच महापौर होणार, अशी वक्तव्ये न करण्याची ‘मौननीती’ तूर्तास बाळगली आहे. भाजपच्या सुकाणू समितीची बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी रात्री ‘वर्षां’ निवासस्थानी झाली. त्यावेळी मुंबईसह राज्यातील सर्व महापौर व जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीबाबत विस्तृत चर्चा झाली. शिवसेनेने मुंबईत केवळ ६० जागांचा प्रस्ताव देऊन भाजपची ‘औकात’ काढली होती. त्यामुळे आता भाजपकडून मुंबई महापौर व सत्तेत सहभागी होण्याबाबत कोणताही प्रस्ताव किंवा पुढाकार घेतला जाणार नाही. युती शिवसेनेने तोडली आहे आणि त्यांना सत्तेसाठी काँग्रेस किंवा अन्य कोणाशीही तडजोड करण्यापेक्षा भाजपची गरज भासत असेल, तर त्यांनी ‘सन्मानपूर्वक’ सत्तासहभागाचा प्रस्ताव देईपर्यंत वाट पाहण्याची भाजपची भूमिका आहे. सरकाकर टिकविण्यासाठी अपमानास्पद प्रस्ताव स्वीकारून तडजोड करायची नाही. मुंबईत भाजपला बरोबर घेणार नसाल, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजप शिवसेनेला सोबत घेणार नाही, अशी सेनेची कोंडी करण्याचे भाजपने ठरविले आहे.

  • शिवसेनेकडून काँग्रेसचा पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्न होत असल्याने ‘काँग्रेस भ्रष्ट असून वैचारिक लढाई असल्याचे व त्यांच्याबरोबर जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
  • काँग्रेसचा पाठिंबा शिवसेनेने घेऊ नये, यासाठी दबाव आणण्याची भाजपची खेळी आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरोधात रान उठवून राज्यात सत्तेवर येऊनही त्यांचा पाठिंबा भाजप घेणार नाही, अशी भूमिका मांडण्याचे जाणीवपूर्वक टाळले, असे सूत्रांनी स्पष्ट केले. ल्ल शिवसेनेच्या ‘सन्मानपूर्वक’ प्रस्तावाची अजून चार-पाच दिवस वाट पाहून तोपर्यंत अन्य पक्षांचा पाठिंबा मिळविण्यासाठी पडद्याआडून हालचाली करण्याची व्यूहरचना भाजपने केली आहे.