मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रचाराची मुदत संपल्यावर प्रसिद्धिमाध्यमांना दिलेल्या मुलाखतींना शिवसेनेने आक्षेप घेतला असून हा आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे दाखल केली आहे. आयोगाने दखल न घेतल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. हा ‘पेड न्यूज’चाच प्रकार असल्याचा संशय शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला असून सरकारी यंत्रणा वापरून मुख्यमंत्री विरोधकांना धमकावत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. संपादकीय मुलाखतींना ‘पेड न्यूज’ ठरविणे, हा पत्रकारितेचा अपमान असल्याचे भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी म्हटले आहे. दरम्यान, प्रसिद्धिमाध्यमांमधील मुलाखतींवर बंदी घालण्याचा अधिकार आयोगाला नसल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एच. सहारिया यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांच्या मुलाखती हा मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप राऊत यांनी केला. मुख्यमंत्र्यांना मुलाखतींची परवानगी मिळत असेल, तर सर्वानाच मिळायला हवी, असे राऊत यांनी सांगितले. निवडणुकीत किती जागा मिळतील, हे शिवसेनेने जाहीर करण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. त्यावर आकडे लावण्याचे धंदे आम्ही करीत नसल्याचे खासदार अनिल देसाई यांनी सांगितले.

दरम्यान, ज्यांची ६० जागा लढविण्याची लायकी नाही, अशा पक्षाबद्दल शिवसेनेचा थयथयाट का सुरू आहे, असा सवाल प्रवक्ते भांडारी यांनी केला. शिवसेना पराभूत मानसिकतेत असून रडीचा डाव खेळण्याची सवय लागली असल्याचे भांडारी यांनी म्हटले आहे.