राज्यातील १० महानगर पालिका, ११ जिल्हा परिषदा आणि ११८ पंचायत समित्यांसाठी आज मतदान झाले. उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. गेल्या महिन्याभरापासून प्रचाराच्या कामात जुंपलेले नेते आणि कार्यकर्ते आता काही वेळासाठी विश्रांती घेऊ शकतील. त्यांचे भवितव्य किंवा त्यांची ‘औकात’ गुरुवारी कळणार आहे. तोपर्यंत त्यांना क्षणभर उसंत मिळणार आहे.

राज्यातील सर्वाधिक मोठा अर्थसंकल्प असलेली महानगर पालिका म्हणून जिचा लौकिक आहे त्या मुंबईच्या महानगर पालिकेसाठी राज्यातील सर्व प्रमुख पक्षांनी जीवाचे रान केले. गेल्या २५ वर्षांपासून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये असलेली युती ही मुंबई महानगर पालिकेमुळेच तुटल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना आणि भाजपच्या भांडणात एकमेकांची उणीदुणीच नाही तर एकमेकांची ‘औकात’ देखील काढण्यात आली. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने ही लढाई आपल्या अस्तित्वाची मानली आणि त्याप्रमाणेच या निवडणुकीचा प्रचार झाला.

मुंबईमध्ये ५२.११ टक्के मतदान झाले. मुंबई महानगरपालिकेतील आजपर्यंतच्या मतदानाचा इतिहास पाहता मतदानाची टक्केवारी फारशी उत्साहवर्धक राहिलेली नाही. गेल्या तीन वर्षातील मतदानाची सरासरी ४४ टक्के एवढीच राहिली आहे. सन २००२च्या निवडणुकीत ४३ टक्के, सन २००७ मध्ये ४६ टक्के, सन २०१२ मध्ये ४५ टक्के अशी मतदानाची टक्केवारी होती. पुण्यातही मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. युवक, युवती, महिला, ज्येष्ठ नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसले. अनेक मतदान केंद्रावर निवडणूक अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन, गुलाबाचे फूल देऊन सकाळी मतदारांचे स्वागत केले. सकाळी लवकर येऊन मतदान केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासही ते विसरले नाही. वयोवृद्ध आजी असो वा माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. पुण्यात ४९.५२ टक्के मतदान झाले. काही ठिकाणी रिक्षावाल्यांनी मतदारांना मोफत सेवाही दिली. पिंपरी चिंचवडमध्ये ५१.८६ टक्के मतदान झाले.

नाशिक महानगर पालिकेचे प्रेझेंटेशन दाखवून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना मतदान करा असे आवाहन केले होते. तर आपण नाशिकला दत्तक घेऊ आमच्याच पक्षाला मतदान करा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. नाशिकमध्ये ५२.६३ टक्के मतदान झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरमध्ये शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी अशी लढत झाली. निवडणुकी आधी काही संघाच्या कार्यकर्त्यांनी इतर पक्षात प्रवेश केल्याचीही चर्चा झाली होती. नागपुरात ४९.९५ टक्के मतदान झाले. मतदानाचा निकाल गुरुवारी लागणार आहे. दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होऊन कोणत्या शहरावर कुणाची सत्ता राहील हे कळणार आहे.