पहिला क्रमांक पटकावल्याचा आनंद, सत्तासमीकरणांचीही चर्चा

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ८४ जागा पटकावणाऱ्या शिवसेनेला ८२ जागा जिंकून भाजपने जोरदार टक्कर दिली असली तरी, पालिकेत सर्वाधिक संख्याबळ असलेला पक्ष ठरल्याने शिवसैनिकांनी चालवलेला जल्लोष शुक्रवारी दिवसभर सुरूच होता. शिवसेनेचे विजयी उमेदवार विभागप्रमुख, नेते आणि समर्थकांसमवेत शिवसैनिक खांद्यावर भगवा फडकावीत, घोषणाबाजी करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ‘मातोश्री’वर येत होते. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर ‘मातोश्री’ परिसरात गर्दी होती. एकीकडे शिवसेनेच्या उमेदवारांचा जयजयकार सुरू असतानाच येथे जमलेल्या शिवसैनिकांत पालिकेतील सत्तासमीकरणांचीही चर्चा रंगली होती.

police arrest suspected killer in double murder case
चिखलात लपून बसलेल्या संशयित खुनीला पकडले
jewellery police pune
पुणे : रिक्षा प्रवासी महिलेचे सात तोळ्यांचे दागिने गहाळ; पाेलिसांच्या प्रयत्नांमुळे दागिन्यांचा शोध
Koyta gang in police trap
पुणे : ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांमुळे कोयता गॅंग पोलिसांच्या जाळ्यात
pregnant woman in Miraj taluka
सांगली : अडलेल्या महिलेसाठी वाटही अडली

महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांनी तसेच शिवसैनिकांनी शुक्रवारी सकाळपासून ‘मातोश्री’वर गर्दी करण्यास सुरुवात केली. ढोल-ताशाच्या गजरात भगवा फडकावीत गुलालाची उधळण करीत येणाऱ्या शिवसैनिकांच्या जथ्यांनी वांद्रे परिसर दणाणून सोडला होता. उमेदवारासोबत ठरावीक पदाधिकाऱ्यांना ‘मातोश्री’मध्ये सोडण्यात येत होते, तर बाहेर त्यांच्या समर्थकांची घोषणाबाजी सुरू होती. शिवसैनिकांची गर्दी वाढू लागल्याने कलानगरच्या प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या पोलिसांवर ताण पडत होता. सुरक्षेच्या दृष्टीने आत जाणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करण्यात येत असल्याने प्रवेशद्वाराबाहेर मोठी रांग लागली होती.

शिवसेना पालिकेमधील सत्ता समीकरण कसे जुळविणार, याबाबत विजयी उमेदवारांच्या समर्थकांमध्ये कुजबुज सुरू होती. पुन्हा भाजपबरोबर युती करावी लागणार की काय, असा नाराजीचा सूरही शिवसैनिकांमध्ये उमटत होता.

शिवसैनिकांमध्ये अशी चर्चा सुरू असतानाच निरनिराळ्या विभागांत पक्षाच्या अधिकृत उमेदवारापुढे बंडाचा झेडा फडकावीत विजयी झालेले बंडोबा ‘मातोश्री’ भेटीसाठी येताना दिसताच अनेकांच्या भुवया उंचावल्याचे दिसत होते. उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन बंडोबा विजयी मुद्रेने ‘मातोश्री’मधून बाहेर पडत होते. यावरून शिवसेनेच्या नगरसेवकांच्या आकडय़ात भर पडल्याचे ओळखणाऱ्या शिवसैनिकांचे चेहरे खुलत होते. तर आपल्या ओळखीचा बंडखोर माघारी परतल्यामुळे काही शिवसैनिक त्याला आलिंगनही देत होते. त्यामुळे ‘मातोश्री’बाहेरील जल्लोषात आणखी भर पडत होती.