मुंबई, ठाण्यासह दहा महानगरपालिका, ११ जिल्हा परिषदा व ११८ पंचायत समित्यांसाठी मंगळवारी मतदान होत आहे. यापैकी मुंबई महानगरपालिकेची लढत सर्वात मानाची आणि प्रतिष्ठेची समजली जात आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात रंगलेल्या कलगीतुऱ्यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे. यंदाची निवडणूक शिवसेना आणि मनसे या स्थानिक पक्षांसाठी अस्तित्त्वाची लढाई ठरणार आहे. तर आक्रमक प्रचार आणि सुनियोजित रणनीती यांच्या जोरावर भाजप शिवसेनेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

मतदानाच्या या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात ते म्हणजे मतदार. एक सुजाण आणि जबाबदार नागरिक म्हणून सर्वांनीच त्यांचा मतदानाचा हक्क बजावणे अपेक्षित असते. सर्वसामान्य मतदारांपासून ते अगदी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आहे. ज्येष्ठ गीतकार गुलजार, झोया अख्तर, अभिनेत्री रेखा, अनुष्का शर्मा यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. गुलजार यांनी मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सर्वांनाच मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तर अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या दिवसाची सुरुवात मतदानाने करत एक फोटो तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट केला आहे. #VoteKarMaharashtra या हॅशटॅगसह तिने मतदान केल्याचा फोटो ट्विट केला आहे. अभिनेता रणवीर सिंगनेही मतदानाचा हक्क बजावला असून त्यानेही इतरांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. सध्या सर्वत्र मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असून दिवस जसजसा पुढे सरकेल तसतसे मतदार त्यांचे मत नोंदवण्यासाठी गर्दी करतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

kap-683x1024