मुंबई महानगरपालिकेत स्वबळावर सत्तेचा सोपान गाठणे कोणत्याही पक्षाला शक्य झालेले नाही. त्यामुळे बहुमताचा आकडा गाठण्यासाठी शिवसेना-भाजपची कसरत सुरु आहे. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र यासाठी आधी शिवसेनेने भाजपसोबत राज्यातील सत्तेत राहायचे की नाही, ते निश्चित करावे, अशी अट काँग्रेसने पुढे केली आहे.

‘राज्यातील युती तुटल्यास मुंबई महापालिकेत शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल विचार करु,’ असे सूचक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे. ‘भाजप आणि शिवसेना राज्यातील सत्तेत एकत्र आहेत. मुंबई महापालिकेत एकत्र यायचे की नाही, याबद्दल या दोन्ही पक्षांचा निर्णय अद्याप झालेला नाही,’ असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. ‘शिवसेना राज्यातील सत्तेतून बाहेर पडल्यास मुंबई महापालिकेत त्यांना पाठिंबा देण्याबद्दल विचार करु,’ असे म्हणत काँग्रेसने युतीचा प्रस्ताव दिला आहे.

महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमधील पराभवानंतर काँग्रेस नेत्यांची आत्मचिंतनासाठी बैठक झाली. मुंबईतील गांधी भवन येथे ही बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बोलावलेल्या या बैठकीला माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. ‘महापालिकेतील सत्ता हवी असेल, तर राज्यातील सत्ता सोडा,’ अशा आशयाचा प्रस्ताव काँग्रेसने अप्रत्यक्षपणे शिवसेनेला दिला आहे. अद्याप या प्रस्तावावर शिवसेनेकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी उद्या शिवसेनेची महत्वाची बैठक संध्याकाळी ४ वाजता शिवसेना भवनात होणार आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवक हजर राहणार आहेत. या बैठकीत मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची रणनीती ठरणार आहे.

मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे ८४, भाजपचे ८२ उमेदवार निवडून आले आहेत. तर काँग्रेसचे ३१ उमेदवार विजयी झाले आहेत. महापालिकेत सत्तेचा सोपान गाठण्यासाठी ११४ नगरसेवकांचा पाठिंबा आवश्यक आहे. शिवसेनेला तीन नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने शिवसेनेचे संख्याबळ ८७ वर पोहोचले आहे.