राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका

शिवसेना आणि भाजपमध्ये युतीवरून धुसफूस सुरू असतानाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीतही आघाडीवरून ‘तु तू मै मै’ सुरू झाले आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांनी आक्षेप घेतल्याच्या पाश्र्वभूमीवर आघाडीस आमची तयारी आहे, पण काँग्रेसने निर्णय घ्यावा, असे सांगत राष्ट्रवादीने आघाडीचा निर्णय काँग्रेसच्या कोर्टात ढकलला आहे.

महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये आघाडी व्हावी, अशी भूमिका राष्ट्रवादीने मांडली आहे. आमची आघाडी करण्याची तयारी आहे. पण काँग्रेसने याबाबतचा अंतिम निर्णय घ्यावा, अशी भूमिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मांडली. सध्या बीड, लातूर, हिंगोली, जालना, नांदेड, यवतमाळ, बुलढाणा, जळगाव, नाशिक जिल्ह्य़ांमध्ये आघाडीबाबतची चर्चा प्रगतीपथावर आहे. ठाणे महानगरपालिकेत चर्चा सुरू आहे, अशी माहिती तटकरे यांनी दिली.

राष्ट्रवादी संसदीय मंडळाच्या बैठकीत जिल्हावार आढावा घेण्यात आला. काँग्रेसबरोबर आघाडीसाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला असता काँग्रेसबरोबर आघाडीसाठी तयारी दर्शविण्यात आल्याचे तटकरे यांनी सांगितले. काँग्रेसने तयारी दर्शविली तरच आघाडी होऊ शकते, असेही त्यांनी सूचित केले. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला चांगले यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करतानाच तटकरे यांनी, नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षाला चांगले यश मिळाल्याचा दावा केला. आघाडय़ा किंवा अपक्षांमध्ये सर्वाधिक राष्ट्रवादीचे सदस्य आहेत. अनेक ठिकाणी अपक्ष किंवा आघाडय़ांच्या माध्यमातून निवडणुका लढविण्यात आल्या आहेत. काँग्रेसशी तोडीचेच राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आल्याचा दावाही त्यांनी केला.

ठाणे महानगरपालिकेत आघाडीस काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे व राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी तयारी दर्शविली आहे. ठाण्यात मात्र कळवा व मुंब्य्रातील जागांवरून आघाडीचे घोडे आडले आहे. कळवा आणि मुंब्रा येथे प्रत्येकी पाच जागांवर काँग्रेसने दावा केला असून, तेवढय़ा जागा देण्यास आव्हाड यांनी नकार दिला आहे.