पथनाटय़ातून काँग्रेसचा शिवसेना-भाजपला सवाल

‘बाबा मला पेंग्विन पाहिजे, पेंग्विन पाहिजे.. पालिकेच्या तिजोरीतील कोटय़वधी रुपये खर्च करून आणलेल्या आठपैकी एका पेंग्विनचा मृत्यू झाला. पालिकेचे कोटय़वधी रुपये पाण्यात गेले.. डिड यू नो..’;  ‘मुंबईकरांना अपुरे, दूषित पाणी मिळते, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेत, रस्ते खड्डय़ात गेले.. डिड यू नो..’; ‘नोटा बंदीमुळे अर्थव्यवस्था कोलमडली.. डिड यू नो..’ पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पथनाटय़ातून काँग्रेसने शिवसेना-भाजपला सवाल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर या पथनाटय़ातून मतदारांमध्ये जनजागृतीही करण्यात येणार आहे.

गेली २०-२२ वर्षे शिवसेना-भाजपने मुंबई महापालिकेवर सत्ता गाजविली. पण मुंबई आजही २०-२२ वर्षे मागेच आहे. मुंबईकरांना आजही अपुरा आणि दूषित पाणीपुरवठा होत आहे. लाच दिल्याशिवाय जन्म, मृत्यू दाखला, विवाह नोंदणी केली जात नाही. मुंबईतील अनेक भागात कचरा उचलला जात नाही. त्यामुळे रोगराई पसरत असून साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. पालिका रुग्णालयांची दुरवस्था झाली आहे. घोटाळ्यांवर घोटाळे उघड होत आहेत. नोटाबंदीच्या निर्णयामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. या सर्वावर पथनाटय़ाच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्याचा संकल्प काँग्रेसने सोडला आहे. या पथनाटय़ात शब्द बदल करून सादर करण्यात येणाऱ्या काही चित्रपट गीतांच्या माध्यमातून शिवसेना-भजपच्या कारभारावर कोरडे ओढण्यात आले आहेत. मुंबई विभागीय काँग्रेस कार्यालयाच्या सभागृहात या पथनाटय़ाचे सोमवारी सादरीकरण करण्यात आले.

शाहीर साबळे यांचे नातू आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांचे भाऊ मंदार शिंदे यांनी पालिकेच्या कारभारावर आसूड ओढणारे पथनाटय़ तयार केले असून २० जानेवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत दररोज पाच ठिकाणी हे पथनाटय़ सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी माजी खासदार मिलिंद देवरा, एकनाथ गायकवाड, बिहारचे आमदार अजित शर्मा, माजी आमदार चरणसिंह सप्रा, पालिकेतील विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा उपस्थित होते.

नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशभरात ४५ लाख लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. त्यामध्ये मुंबईमधील २५ लाख लोकांचा समावेश आहे. मुंबईतील अस्वच्छता, अपुरा पाणीपुरवठा, खड्डेमय रस्ते असे अनेक प्रश्न बिकट होत आहेत. दर वर्षी तीन-साडेतीन हजार कोटी रुपये खर्च करूनही रस्ते खड्डय़ात आहेत. मुंबईकरांनी कररूपात पालिकेच्या तिजोरीत जमा केलेल्या पैशांनी शिवसेना-भाजपने उधळपट्टी केली आहे. पालिकेतील घोटाळे उघडकीस आले आहेत. याबाबत पथनाटय़ाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे, असेही निरुपम यांनी सांगितले.

काँग्रेस स्वबळावर लढणार

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाबरोबर युती करण्याचा काँग्रेसचा विचार नाही. ही निवडणूक स्वबळावर लढविणाची मुंबईतील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पक्षश्रेष्ठींनीही ही निवडणूक स्वबळावर लढविण्यास अनुमती दिली आहे. त्यामुळे काँग्रेस पालिका निवडणूक स्वबळावर लढविणार आहे. मात्र जेगेंद्र कवाडे यांच्या आरपीआय पक्षाला काही जागा देण्यात येणार आहेत, असे संजय निरुपम यांनी स्पष्ट केले.

रिझव्‍‌र्ह बँकेला घेराव

नोटाबंदीच्या निर्मयामुळे ग्रामीण भागातील जनतेचे अतोनात हाल झाले. नोटाबंदीचा प्रयोग पूर्णपणे अपयशी ठरला आहे. त्यामुळे अखिल भारतीय कांग्रेस कमिटीने १८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता देशभरातील रिझव्‍‌र्ह बँकेच्या ३३ कार्यालयांना घेराव घालण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसतर्फे १८ जानेवारी रोजी बॅलार्ड पिअर येथील रिझव्‍‌र्ह बँकेच्या कार्यालयाला घेराव घालण्यात येणार आहे. त्यास काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी होणार आहे, असे संजय निरुपम म्हणाले.