दहा जिल्हा परिषदांतील सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र

शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही भाजपचे कमळ फुलल्याने ग्रामीण भागांच्या सत्ताकरणात पारंपरिक प्राबल्य असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हादरा बसला असून, जिल्हा परिषदांची सत्ता हस्तगत करण्याकरिता दोन्ही काँग्रेसने एकमेकांपुढे हात पसरले आहेत. दोन्ही काँग्रेस एकत्र आल्यास दहा जिल्हा परिषदांमध्ये सत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल आणि राज्याचे काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्यात झालेल्या चर्चेनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जिल्हा परिषदांमध्ये सत्तेसाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. जास्त सदस्य असलेल्या पक्षाचा जि. प. अध्यक्ष असे आघाडीचे सूत्र कायम राहील. राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या झालेल्या बैठकीत यावर ऊहापोह करण्यात आला.

शहरी भागांमध्ये शिवसेना-भाजप तर ग्रामीण भागात काँग्रेस व राष्ट्रवादीचे पारंपरिक प्राबल्य राहिले आहे. परिणामी जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये वर्षांनुवर्षे काँग्रेस वा राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. यंदा प्रथमच ग्रामीण भागांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला भाजपने शह दिला. दहापैकी आठ महापालिकांमध्ये सर्वाधिक जागा मिळालेल्या भाजपला जिल्हा परिषदांमध्येही चांगले यश मिळाले. जिल्हा परिषदांच्या एकूण दीड हजार जागांपैकी सर्वाधिक ४०० पेक्षा अधिक जागा भाजपच्या निवडून आल्या आहेत. पंचायत समित्यांच्या एकूण तीन हजार जागांपैकी सर्वाधिक ८५० उमेदवार भाजपचे निवडून आले आहेत. यातूनच काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता पसरली. ग्रामीण भागातील सत्ताकेंद्रास भाजपने सुरुंग लावल्याने दोन्ही काँग्रेसने एकत्र येण्याचा निर्णय घेतला.

फायदा कुठे?

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. पुणे आणि सातारा या दोन जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादीचे बहुमत आहे. रायगडमध्ये शेकाप आणि राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. म्हणजेच या चार जिल्हा परिषदांमध्ये एकमेकांची गरज लागणार नाही. नांदेड जिल्हा परिषदेत काँग्रेसचा चार सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. नगर आणि अमरावतीमध्ये काँग्रेसला राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची गरज लागणार आहे. परभणी, उस्मानाबाद, सोलापूरमध्ये राष्ट्रवादीचे सर्वाधिक सदस्य निवडून आले आहेत. कोल्हापूर, हिंगोली, बीड या जिल्हा परिषदांमध्ये दोन पक्षांबरोबरच छोटय़ा पक्षांना एकत्र केल्यास सत्ता मिळू शकते. २५ पैकी १२ जिल्हा परिषदांमध्ये आघाडीची सत्ता येऊ शकते.

विखे-पाटील आणि थोरात यांचा अध्यक्षपदावर दावा

नगर जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा निवडून आलेल्या काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात वाद सुरू झाला आहे. दोन्ही गटांनी अध्यक्षपदावर दावा केला आहे. सर्वाधिक १५ सदस्य आपल्या गटाचे निवडून आल्याचा दावा विखे-पाटील समर्थकांनी केला आहे. या संदर्भात प्रदेशाध्यक्ष चव्हाण हे दोन्ही नेत्यांशी चर्चा करणार आहेत.