भाजपला जिल्हा परिषदेच्या ४००, तर पंचायत समितीच्या ८३१ जागा

केवळ शहरी भागातील म्हणून ओळखला जाणारा भारतीय जनता पक्ष (भाजप) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून थेट गावापर्यंत जाऊन पोहोचल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. मुंबई-पुण्यासारख्या शहरांबरोबरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून हा पक्ष आता दिल्लीपासून थेट गावपाडय़ापर्यंत विस्तारल्याचे जिल्हा परिषद-पंचायत समितींच्या निकालावरून दिसून येते. या निवडणुकीत २५ जिल्हा परिषदेच्या एकूण १५०९ जागांपैकी तब्बल ४०६ तर २८३ पंचायत समितीच्या एकूण २९९० जागांपैकी ८३१ जागांवर कब्जा करीत भाजपने ग्रामीण राजकारणावरील राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मक्तेदारी मोडीत काढण्यात यश मिळविले आहे.

२५ जिल्हा परिषदेतील १५०९ जागांसाठी तब्बल सात हजार २६७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामध्ये अमरावतीमध्ये ५९ जागांसाठी सर्वाधिक ४१७ तर रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी सर्वात कमी १८७ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत सर्वाधिक ४०६ जागा जिंकत भाजपने जिल्हा परिषदेमध्येही आपली हुकूमत प्रस्थापित केली आहे. या पक्षाला विदर्भातील सहा जिल्ह्य़ांत ३३९ पैकी १३८ जागा मिळाल्या आहेत. त्याचप्रमाणे मराठवाडय़ात ४६० पैकी १३२, नाशिक विभागात २१२ पैकी ६२ जागा मिळवीत भाजपने आपली ताकद दाखवून दिली आहे. मात्र त्यांना पश्चिम महाराष्ट्रात घुसखोरी करता आली असली तरी ६५ जागांपर्यंत मजल मारता आली असून कोकणात मात्र केवळ ९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. जिल्हा परिषदांमध्ये ३६० जागा जिंकत राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर राहिला असून काँग्रेसला ३०९ तर शिवसेनेला २७१ जागा जिंकता आल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाने राष्ट्रवादीला काहीसे तारले आहे.

बदललेले चित्र

मुंबईसह १० महापालिकांबरोबरच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही भाजपने जोरदार मुसंडी मारल्याचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालावरून स्पष्ट होते. सन २०१२मध्ये झालेल्या निवडणुकीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, हिंगोली या चार जिल्ह्य़ांचा अपवाद वगळता २६ पैकी २२ जिल्हा परिषदांवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची स्वतंत्र किंवा एकत्रित पकड होती. मात्र आता चित्र पुरते बदललेले आहे.

नुकत्याच निवडणुका झालेल्या २५ जिल्हा परिषदांपैकी जळगाव, लातूर, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्हा परिषदेमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्याचप्रमाणे सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, चंद्रपूर आदी जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष म्हणून भाजप पुढे आला आहे.

पंचायत समितीमध्येही बोलबाला

राज्यातील २८३ पंचायत समित्यांच्या २९९० जागांसाठी तब्बल १२ हजार ५७७ उमेदवार आपले राजकीय भाग्य आजमावण्यासाठी निवडणुकीच्या आखाडय़ात उतरले होते. त्यात २९९० जागांपैकी ८३१ जागा जिंकत पुन्हा एकदा भाजपनेच अव्वल स्थान पटकावले आहे. तर दुसऱ्या स्थानावर ६७४ जागाजिंकत राष्ट्रवादी काँग्रेस आली असून ५९१ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. तर शिवसेनेला ५८१ जागांपर्यंत मजल मारता आली. पंचायत समित्यांमध्ये विदर्भात २६६ आणि मराठवाडय़ात २९४ जागाजिंकत भाजपने विरोधकांना नमवले आहे. उत्तर महाराष्ट्रात १२६ आणि पश्चिम महाराष्ट्रात ११६ जागा जिंकून याही भागात आपले स्थान पूर्वीपेक्षा मजबूत करणाऱ्या भाजपला कोकणात केवळ २९ जागांपर्यंत मजल मारता आल्याने अजूनही हा पक्ष कोकणात मागे असल्याचे दिसू येते. राष्ट्रवादीने पुणे विभागात २५४ आणि औरंगाबाद विभागात २१२ जागा जिंकत आपली पत राखण्यात यश मिळविले आहे.