महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज, रविवारी सायंकाळी थंडावणार असताना शनिवारी साऱ्याच राजकीय पक्षांनी प्रचारसभांचा सपाटा लावून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. त्यातच पुण्यातील सभा श्रोते नसल्याने रद्द करावी लागल्याच्या मुद्दय़ावरून साऱ्यांनीच मुख्यमंत्र्यांना चिमटा काढण्याची संधी सोडली नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही ठाकरे बंधूंवर प्रतिहल्ला चढवला. तसेच मुंबईतील झोपडपट्टीधारकांना ३०५ चौरस फुटाची सदनिका देण्याचे आश्वासन देत झोपडपट्टीवासिय मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला.

‘नमामि गंगा’चा पैसा गेला कुठे? – उद्धव यांचा भाजपला प्रश्न

नागपूर महापालिकेतील घोटाळाप्रकरणी नंदलाल समितीने देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठपका ठेवला होता. मुंबई महापालिकेतील एकही शिवसेनेचा नगरसेवक घोटाळ्यात सापडलेला नाही. नालेसफाईत आम्ही घोटाळा केल्याचा आरोप केला जातो. मग उत्तर भारतातील ‘नमामि गंगा’ प्रकल्पात हजारो कोटी खर्च होऊनही गंगेचा एक थेंब पाणी शुद्ध झाले नाही. तो पैसा गेला कुठे, असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवरच गैरव्यवहारावरून तोफ डागली. आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यापूर्वी तुमचे मंत्री भ्रष्टाचारात किती बरबटले आहेत ते पाहा, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.

कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही..  – मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेवर घणाघात

मुंबई : ‘माझेही कुलदैवत नरसिंह आहे. त्यामुळे मी कोणाला घाबरत नाही आणि भ्रष्टाचाऱ्यांचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही’, असा इशारा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. शनिवारी चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर भाजपची प्रचारसांगता सभा झाली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

 

फडणवीसांना अहंगंड!   –  पवार यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला

मुंबई : महाराष्ट्र ज्यांना अद्याप नीट समजलेला नाही ते ‘हा माझा शब्द’ आणि ‘मी’पणा करीत आहेत. अटलबिहारी वाजपेयी किंवा लालकृष्ण अडवाणी यांच्या काळातही भाजपमध्ये एवढा ‘मीपणा’ कधीच नव्हता. मी मी म्हणणाऱ्यांचे पुढे काय होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शनिवारी जोरदार हल्ला चढविला. महापालिका निवडणुकीत मुंबईत भाजपचे वर्चस्व असणार नाही, असे स्पष्ट करून शिवसेनाच अव्वल राहील, असे भाकीत पवार यांनी केले.