भाजप उमेदवारासह ७ जण कोठडीत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विजयी उमेदवार आणि कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या भाजप उमेदवार सुधीर खातूंसह एकूण सात आरोपींना विनोबा भावे नगर पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी या सर्वाना न्यायालयाने २७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत धाडले. खातूंना गुन्हेगारी पाश्र्वभूमी आहे. गेल्या लढतीत पराजय पदरी पडल्यानंतर रागाच्या भरात त्यांनी व भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे माजी विभागप्रमुख भाऊ कोरगांवकर यांच्यावर हल्ला केला होता.

प्रभाग क्रमांक १६६ मधून मनसेचे सुनील तुरडे अकराशे मतांनी विजयी झाले. सलग दोनदा पराभव झाल्याने अहंकार दुखावलेल्या खातू व त्यांच्या कार्यकर्त्यांनी रात्री दहाच्या सुमारास कुर्ला येथील शीतल तलाव परिसरात तुरडे व त्यांच्या सहकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला चढवला. यात तुरडे यांच्यासह मनीष येलकर, स्वप्निल जगताप, प्रवीण जाधव, शैलेश आसोलकर व अन्य कार्यकर्ते जखमी झाले. या सर्वाना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तुरडे आणि अन्य काही कार्यकर्ते गंभीर जखमी असून अतिदक्षता विभागात दाखल आहेत. तुरडे यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल, अशी माहिती त्यांचे बंधू मदन देतात.

दरम्यान, व्ही. बी. नगर पोलिसांनी रात्री हत्येचा प्रयत्न, गंभीर मारहाण, घातक शस्त्रांनी हल्ला, घातक शस्त्रांचा हल्ल्यासाठी वापर, दंगल या कलमान्वये गुन्हा नोंदवून खातू यांच्यासह किरण पवार, हेमंत पवार, सुनील माधगुंडे, गजानन कोरवे, गणेश कासरवाडी, वैभव गुरुलकर यांना अटक केली. हा हल्ला पराजय न पचल्याने करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.