मनसेचा हल्ला

नीतिमत्ता, तत्त्व, चारित्र्य आदी मुद्दे डोक्याला बांधून कोणत्याही परिस्थितीत मुंबई व ठाण्यासह राज्यातील महापालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी गुंडांची व खंडणीखोरांची जोरात भरती भाजपने चालविल्यामुळे श्यामाप्रसाद मुखर्जी, हेडगेवार, गोळवलकर गुरुजी व बाळासाहेब देवरस यांचा आत्मा तृप्त झाला असेल, अशी उपरोधिक टीका मनसेने केली आहे.

मुंबईसह राज्यातील सर्व महापालिकांमध्ये मनसेच्या अनेक आजी-माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांना फोडण्याचा उद्योग भाजपने केल्यामुळे मनसेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. मुंबईत मनसेचे माजी गटनेते व आमदार मंगेश सांगळे यांनाही नगरसेवकाची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुंडापुंडांचा भाजप बनवून नवा ‘आदर्श’ निर्माण केल्याचे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या ‘आदर्श’ घोटाळ्यापेक्षा फडणवीसांनी ज्या प्रकारे भाजपला ‘आदर्श’ बनवले आहे ते समाजासाठीही घातक असल्याचे नांदगावकर म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आणि भाजपसाठी खस्ता खाल्लेल्या सच्चा कार्यकर्त्यांना हा ‘आदर्श’वाद चालणार आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. उल्हासनगरमध्ये ज्या पप्पू कलानी यांचे शरद पवार यांच्याशी संबंध असल्यावरून दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी पवारांना सळो की पळो करून सोडले. त्यांचाही आत्मा ओमी कलानी याच्याशी भाजपने केलेल्या युतीमुळे ‘सुखावला’ असेल, असा टोला नांदगावकर यांनी लगावला. ठाण्यात तर गुरुवारी तीन कोटींच्या खंडणी प्रकरणातील आरोपी असलेल्या काँग्रेस नगरसेवक नारायण पवार याचे ज्या जल्लोशात राज्यमंत्री रवींद्र पवार, खासदार कपिल पाटील आणि संजय केळकर यांनी स्वागत केले ते पाहता संघाच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर मूठभर मांस चढले असेल. मनसेने मराठी माणसासाठी आंदोलने करून अनेक केसेस अंगावर घेतल्या परंतु भाजप खंडणीखोर दाखलेबाज गुंडांना घेऊन कोणता ‘पारदर्शक’ संदेश देऊ पाहते, असा सवालही नांदगावकर यांनी केला.

मनसेने हकालपट्टी केलेल्या नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्यासाठी भाजप तेथील जागा सोडू पाहात असेल तर भाजपला मतदार त्यांची जागा दाखवून देतील असेही ते म्हणाले. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण दोन दोन वेळा लाल दिव्याची गाडी घेऊन चव्हाण यांच्या दारी मुजरा करायला जातात, यातच सारे काही आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर या गुंडाच्या भर्तीचे काम सुरू असून पुण्यात व नाशिकमध्येही अनेक दाखलेबाज गुंडांना भाजपत प्रवेश देण्यात आला असून या ‘आदर्श’ मुख्यमंत्र्यांचा फुगा पालिका निवडणुकीत मतदार फोडल्याशिवाय राहणार नाहीत, असेही नांदगावकर म्हणाले.