मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) सोमवारी आणखी एक धक्का बसला. मनसेचे माजी आमदार मंगेश सांगळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मनसेला सोडचिठ्ठी देणाऱ्या नेत्यांमध्ये आणखी एकाची भर पडली आहे. मनसेने २०१२ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली तेव्हा मंगेश सांगळे विक्रोळी मतदारसंघातून विजयी झाले होते. या भागातून मनसेला लक्षणीय मते पडली होती. मात्र, गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेने सपाटून मार खाल्ल्यानंतर पक्षाला उतरती कळा लागली होती. त्यानंतर राज्यभरातील मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी दुसऱ्या पक्षांचा रस्ता धरला होता. आता यामध्ये मंगेश सांगळे यांची भर पडली आहे. नाशिक महानगरपालिकेतही मनसेच्या ४० पैकी २७ नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती.

दहा महापालिकांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागीलवर्षी पक्षात नव्याने संघटनात्मक नियुक्त्या केल्या होत्या. यावेळी मंगेश सांगळे यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, नाराज असलेल्या सांगळे यांनी आज भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यामुळे आपल्याला चेहरा मिळाल्याचे मान्य केले. मात्र, गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे आपण पक्षातून बाहेर पडल्याचे त्यांनी सांगितले.

‘मला राजकारणाच्या माध्यमातून जनसेवा करायची आहे त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे करत असलेल्या कामाने मी प्रभावीत झालो आणि त्यांच्या देशहिताच्या कामात मलाही खारीचा वाटा उचलता यावा म्हणून मी आज भाजपात प्रवेश करत आहे,’ असे मंगेश सांगळे यांनी म्हटले. यावेळी काँग्रेस नेते कृष्णा हेगडे यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केलेले अन्य पक्षांचे नेतेही उपस्थित होते.

आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ताकद वाढविण्यासाठी भाजपकडून अन्य पक्षांच्या नेत्यांना स्वत:कडे खेचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रविवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी  कृष्णा हेगडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आशिष शेलार आदी नेतेमंडळी याप्रसंगी उपस्थित होती. ‘२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ज्यांनी पक्षाविरोधात काम केले त्यांना आज संधी दिली जाते आणि जे पक्षाशी प्रामाणिक राहिले त्यांना डावलले जाते. पक्षाला माझी गरज नसेल तर मी पक्ष सोडणेच योग्य’ असे हेगडे यांनी सांगितले. हेगडे यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला धक्का बसल्याचे सांगितले जाते.

माजी आमदार मंगेश सांगळे, माजी आमदार कृष्णा हेगडे यांच्यासोबतच शिवेसेना नगरसेविका लिना शुक्ला,  मनसेचे नगसेवक भालचंद्र आंबोरे, नगसेवक परविंदसिंग भामरा, शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश नाईक आणि ख्यातनाम अभिनेते दिलीप ताहील यांनी आज मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या पत्रकार परिषदेला आमदार प्रविण दरेकर, महापालिका गटनेते मनोज कोटक, भाजपा मुंबई उपाध्यक्ष भालचंद्र शिरसाट, नगरसेवक विनोद शेलार,  प्रवक्ते अतुल शाह आदी उपस्थित होते.