शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये बुधवारी मुंबईत पार पडलेल्या बैठकीत अखेर युतीच्या जागावाटपाच्या चर्चेला मुहूर्त गवसला. जागावटपाच्या या चर्चेची सुरूवात सकारात्मक झाल्याची माहिती शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी दिली. गेल्या तीन दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या पाडल्या होत्या. यादरम्यानच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील दूरध्नवीवरून चर्चा केली होती. मात्र, या चर्चेचा रोख हा भाजपने उपस्थित केलेल्या पारदर्शकतेच्या मुद्द्यावरच होता. मात्र, आजच्या बैठकीत अखेर जागावाटपाच्या चर्चेला सुरूवात झाली. यावेळी भाजपने सेनेसमोर समसमान जागावाटपाचा फॉर्म्युला ठेवल्याचे समजते. तसेच दोन्ही पक्षांकडून आग्रही असलेल्या वॉर्डांची यादीही एकमेकांना देण्यात येणार आहे. आता या यादीबद्दल वरिष्ठ पातळीवर चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचे अनिल देसाई यांनी सांगितले. आजच्या बैठकीत शिवसेनेकडून अनिल परब, अनिल देसाई, रविंद्र मिर्लेकर यांनी उपस्थिती लावली. तर भाजपकडून आशिष शेलार, प्रकाश मेहता आणि विनोद तावडेंनी हजेरी लावली होती.

युती करायची असेल, तर चार दिवसांत निर्णय घेण्याची अट शिवसेनेने घातली असून तोपर्यंत जागावाटप न झाल्यास स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेनेकडून २३ जानेवारीला केली जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली असून जागावाटपाची चर्चा पुढे सुरू करण्याचे ठरविण्यात आले होते. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी भाजपने राजकीय खेळी करीत ‘पारदर्शी’ कारभाराची अट घातली. युतीच्या चर्चेच्या पहिल्याच बैठकीत हा खोडा घालण्यात आल्यावर ठाकरे व फडणवीस यांच्यातील चर्चेतूनच या मुद्दय़ावर मार्ग काढण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार या दोघांमध्ये चर्चा झाली. महापालिकेतील आयुक्तांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांकडून होते. अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून केवळ शिवसेनेला जबाबदार धरता येणार नाही. नागपूर महापालिकेतील कारभाराची काही उदाहरणेही शिवसेनेकडून भाजपला देण्यात आली आहेत. मुंबई महापालिकेत भाजपही सत्तेत सहभागी असल्याची जाणीव शिवसेनेकडून करून देण्यात आली होती. तर दुसरीकडे भाजपनेही स्वबळावर लढण्याची तयारी सुरू ठेवली असून मुंबई विभागाच्या निवडणूक समितीची बैठक मंगळवारी झाली. जिल्हा स्तरावरून इच्छुक उमेदवारांच्या याद्या पाठविण्यात आल्या असून त्यावर पुढील दोन-तीन दिवस चर्चा होणार आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी २९ सदस्यांची समिती तयार केली आहे. पक्षाचा जाहीरनामा, निवडणूक तयारी व उमेदवार यादी निश्चिती आदींची जबाबदारी या समितीवर आहे.