मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी शिवसेनेकडून वचननामा जाहीर करण्यात आल्यानंतर भाजपकडून त्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये आश्वासनांची खैरात करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. मुंबई खड्डेमुक्त होईपर्यंत रस्ते कर घेणार नाही, २४ तास पाणी मिळेपर्यंत पाणीपट्टीत सवलत देणार असल्याचे आश्वासन भाजपच्या जाहीरनाम्यातून देण्यात आले आहे. मुंबई महापालिका सध्या रस्ते कर आकारते. एकूण करापैरी साधारण १३ टक्के कर रोड टॅक्समधून जमा होतो. त्यामुळे मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होत नाही तोपर्यंत रोड टॅक्स आकारणार नाही, असे आश्वासन भाजपने जाहीरनाम्यात दिले आहे. तसेच या जाहीरनाम्यात सेनेला डिवचण्याच्या उद्देशाने पालिकेच्या कर प्रणालीचा उल्लेख ‘टॅक्स टेररिझम’ असा करण्यात आला आहे. या टॅक्स टेररिझमविरोधात भाजप मुंबईकरांना भरघोस सूट देणार असल्याचे जाहीरनाम्यात म्हटले आहे.

याशिवाय, ही आश्वासने देताना दोन्ही पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाईदेखील रंगल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना ५०० चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या घरांना मालमत्ता करातून करमुक्त करण्याचे तर ७०० चौरस फूट क्षेत्रफळ असणाऱ्या घरांना मालमत्ता करातून सवलत दिली जाणार असल्याचे म्हटले. मात्र, त्यानंतर काहीवेळातच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी ५०० चौरस फुटांपर्यंतची घरे मालमत्ता करमुक्त करण्याची मागणी आपली असल्याचा दावा केला. मी आमदार म्हणून ही मागणी राज्य सरकारकडे केली होती. या मागणीला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही शेलार यांनी सांगितले. तसेच रस्ते करांतून पालिकेला ५०० ते ६०० कोटी मिळतात. पण या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असून त्यांची अवस्था तशीच आहे. त्यामुळे महापालिकेच्या ‘टॅक्स टेररिझम’मधून मुंबईकरांना सुटका मिळावी,ही आमची भूमिका आहे. यानंतर आता काही जणांना उपरती होत आहे, असे म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.