आयोगाची तयारी सुरू

मुंबईसह दहा महानगरपालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीनंतर लगेचच काही महिन्यांत नवनिर्मित पनवेल महापालिका तसेच भिवंडी-निजामपूर, मालेगाव, परभणी, लातूर आणि चंद्रपूर या महापालिकांच्या निवडणुकांचेही रणशिंग फुंकले जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने या सहा महापालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. साधारणत: एप्रिलमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे. २७ फेब्रुवारीला या सहा महापालिकांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर ४ मार्चपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. ५ जानेवारी २०१७ रोजी प्रसिद्ध झालेली विधानसभेची मतदार यादी या महापालिकांच्या निवडणुकांसाठी ग्राह्य़ धरली जाणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करून त्यावर नागरिकांकडून हरकती व सूचना मागवून त्यानंतर त्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. भिवंडी-निजामपूर, मालेगाव, परभणी, लातूर व चंद्रपूर या पाच महापालिकांचा कार्यकाल मे ते जून यादरम्यान संपुष्टात येत आहे. त्यानुसार या पाच महापालिकांबरोबरच पनवेल महापालिकेचीही निवडणूक घेण्याचे ठरविण्यात आले असून आयोगाने तशी तयारी सुरू केली आहे.