महापालिका, जि.प. निवडणुकांच्या प्रचाराला पूर्णविराम; उद्या मतदान परीक्षा

मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह राज्यातील दहा महानगरपालिका, दहा जिल्हा परिषदा व ११८ पंचायत समित्या येथील सत्तेच्या पदवीसाठीची प्रचाराची तोंडी परीक्षा रविवारी संपली. ‘हा माझा शब्द आहे..’, ‘डिड यू नो..’, ‘अमक्याचा कोथळा काढेन..’, ‘तमका खंडणीखोर आहे..’, ‘अमके अर्धवटराव आहेत..’, ‘ते पक्के थापाडे आहेत..’ अशी तमाम राजकीय पक्षांच्या धुरीणांनी वापरलेली अलंकृत व शब्दकोशांतील धारदार शब्दांना नवी धार चढवलेली भाषा हे या तोंडी परीक्षेचे खास वैशिष्टय़ ठरले. या तोंडी परीक्षेच्या अखेरच्या दिवशी, रविवारी इमारती, सोसायटय़ा, गल्ल्या, वाडय़ा पिंजून काढत राजकीय नेते, उमेदवार यांनी अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा निकराचा प्रयत्न केला. ठिकठिकाणी निघालेल्या बाइक रॅली, पदयात्रा, रोड शो, प्रचारवाहनांतून ‘मते द्या..’चा धोशा यामुळे सारी महानगरे, शहरे गजबजून गेली होती. रविवारचा दिवस लक्षात घेऊन अनेक ठिकाणचे उमेदवार बिर्याणी वा इतर चविष्ट पदार्थाची अंगतपंगत मांडून, त्याचा आस्वाद घेणाऱ्यांना ‘सावकाश होऊ द्या..’चा आग्रह करताना दिसत होते. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बडय़ा नेत्यांच्या फारशा सभा झाल्या नसल्या तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यातील जाहीर सभेने प्रचारमोहिमेची सांगता केली, तर शिवसेनेने शिवजयंतीचा मुहूर्त साधून ‘जय शिवाजी.. जय भवानी’चा नारा देत वातावरण भगवे करण्याचा प्रयत्न केला. ही तोंडी परीक्षा संपल्यानंतर आता उद्या, मंगळवारी मतदानाची मुख्य परीक्षा होणार असून तिचा निकाल गुरुवारी जाहीर होईल.

ही आनंद दिघेंची नव्हे, स्वार्थी नेत्यांची शिवसेना

एकेकाळी ठाणे जिल्ह्य़ावर जनसंघाची पकड होती. रामभाऊ म्हाळगी, राम कापसे, आनंद दिघे यांसारख्या नेत्यांचा हा जिल्हा होता. मात्र ठाण्यात आता आनंद दिघेंची शिवसेना राहिली नसून येथील नेत्यांच्या नातेवाईकांची स्वार्थी सेना तयार झाली आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार संपण्याच्या तासभरआधी ठाण्यात बोलताना केली.

untitled-16