मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपसोबत युती करण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेवर सोमवारी काँग्रेस नेते नारायण राणे यांनी जोरदार टीका केली. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत युती करायची की नाही, यावरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चेचे गु-हाळ सुरू आहे. मात्र, शिवसेना भाजपची युती होणार नाही. शिवसेना कार्यकर्त्यांची फसवणूक करत आहे, असे सांगत राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. याशिवाय, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेनेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरनाम्यावरही नारायण राणे यांनी आसूड ओढले. शिवसेनेचा हा वचननामा अत्यंत बालिश असल्याचे राणे यांनी सांगितले. याशिवाय,  शिवसेनने आपल्या वचननाम्यात डबेवाल्यासाठी भवन बांधणार असल्याचे जाहीर केले आहे. यावरुनही राणेंनी निशाणा साधला. ‘आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा मग डबेवाल्यासाठी भवन बांधा, असा खोचक टोला त्यांनी लगावला. त्यामुळे आता राणे यांच्या टीकेला शिवसेना कशाप्रकारे उत्तर देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीदेखील शिवसेनेच्या जाहीरनाम्यावर ताशेरे ओढले. शिवसेनेने जाहीरनामा ‘रिपीट करून दाखवला’, अशा खोचक शब्दांत त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. शिवसेनेने मागील मनपा निवडणुकीच्या जाहीरनाम्यातील महत्वाचे मुद्दे पुन्हा यंदाच्या जाहीरनाम्यात समाविष्ट केले आहेत. त्यामुळे शिवसेनेने ‘रिपिट करून दाखवलं’, असंच म्हणावे लागेल. गेल्या निवडणुकीत शिवसेनेने ‘करून दाखवलं’ अशी दर्पोक्ती केली होती.  याशिवाय, विरोधी पक्षात असताना शिवसेनेने शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार कोटींचे पॅकेज देण्याची मागणी केली होती. खड्डेमुक्त मुंबई करण्याचे स्वप्न दाखवले होते. परंतु, सत्तेत आल्यानंतर यातील एकही आश्वासन शिवसेनेला पूर्ण करता आले नाही. त्यासाठी त्यांना शेतकरीद्रोही, जनताद्रोही नाही तर आणखी काय म्हणायचं का? असा सवालही विखे पाटील यांनी उपस्थित केला.


दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी संध्याकाळी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात युतीसंदर्भातील भूमिका येत्या २६ तारखेला स्पष्ट करणार असल्याचे संकेत दिले. सध्या ज्यांची नाटक सुरू आहेत अशा मंडळींची नाटकं पाहायची. अजून आपण कुंपणावरच आहोत, इकडे का तिकडे ठरलेलं नाही. त्यामुळे निर्णय होईपर्यंत शांत राहिलेलच बरं, असे सांगत उद्धव यांनी शिवसैनिकांना तुर्तास संयम बाळगण्याचे आवाहन केले.