राज्य सरकारमधील घोटाळेबाज मंत्र्यांना वाचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘क्लीन चिट’ ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालवत आहेत, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. सरकारमधील घोटाळेबाजांविरोधात सर्व पुरावे देऊनही त्यांना वाचविले जाते, असा घणाघाणी आरोपही त्यांनी केला आहे. घोटाळेबाजांनी खात राहावे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांभाळून घ्यावे, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.

‘लोकसत्ता ऑनलाइन’ने आयोजित केलेल्या ‘फेसबुक लाईव्ह चॅटरुम’मध्ये राजकीय संघर्षाचा वारसा चालवणारे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी वाचकांच्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली. यावेळी त्यांनी सर्वसामान्यांपासून ते शेतकऱ्यांच्या समस्या, नोटाबंदी, रोजगार, तरुणांची राजकारणातील भूमिका, महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका, मराठा आरक्षण, बदलता महाराष्ट्र, कौटुंबिक संघर्ष, राजकीय वारसा आदी मुद्द्यांवर त्यांनी रोखठोक मते मांडली. विशेषतः भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार, त्यांनी केलेल्या कामांचे अधिक स्पष्टपणे आणि रोखठोक विश्लेषण केले. राज्य आणि केंद्रातील भाजपचे सरकार ‘कॅम्पेनिंग’ करण्यात आघाडीवर आहे, असा प्रहार त्यांनी सुरुवातीलाच केला. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी अनेक घोषणा केल्या. त्याची जाहिरातबाजी भाजप सरकारकडून केली जात आहे. पण प्रत्यक्षात काहीच केले जात नाही. विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता म्हणून राज्यभर दौरे करत आहे. सरकारने विविध योजनांच्या घोषणा केल्या. पण प्रत्यक्षात काहीच होताना दिसत नाही, अशी वस्तुस्थिती त्यांनी मांडली.

काय म्हणाले मुंडे?

– कॅम्पेनिंग करण्यात राज्य सरकार आघाडीवर आहे. आतापर्यंत नुसत्या घोषणाच केल्या. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाही.

– भाजपचे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी, त्यांना वाचवण्यासाठी कर्जमाफी करावी. दुष्काळाने शेतकरी होरपळतोय. त्यांना कर्जमाफी करून दिलासा द्यावा.

– शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, अशी मागणी दोन वर्षांपासून लावून धरली आहे. पण हे सरकार शेतकऱ्यांच्याच विरोधात आहे. हमीभावात वाढ करणे गरजेचे आहे.

– शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या, पण अंमलबजावणी नाही. या सरकारचा निषेध करत आहोत. आगामी अधिवेशनात या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरू.

– ‘अच्छे दिन’ ऐकायला बरे वाटते. पण त्याने बेरोजगारी कमी झाली नाही. नोटाबंदीने बेरोजगारी वाढेल. नोटाबंदीचा पुढील काही वर्षे मोठा फटका बसेल. त्याला केंद्र आणि त्याचे समर्थन करणारे राज्य सरकार जबाबदार असेल.

– मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. ३१ जानेवारीला मराठा समाजातर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे, अशी त्यांची ठाम मागणी आहे. त्यांच्या मागणीचे मी समर्थन करतो.

– छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या नावाखाली मराठा समाजाच्या मागण्या दाबण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. हे योग्य नाही.

– मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याच्या विरोधात हे राज्य सरकार आहे. त्यांना बहिष्कृत नजरेने पाहणे, हे दुर्दैवी आहे.

– ओबीसी समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.

-जातीपातीच्या पलिकडेही जाऊन राजकारण करावे. जास्तीत जास्त तरुण राजकारणात आले तर राजकारणाला लागलेली जातीयवादाची किड नष्ट होण्यास मदत होईल.

– राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांचे घोटाळे बाहेर आले आहेत. त्या घोटाळेबाजांना वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली आहे. पुरावे देऊनही त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई होत नाही. त्यांनी खात राहावे आणि आम्ही संभाळून घ्यावे, अशीच भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.

– घोटाळेबाजांना मुख्यमंत्री वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत. त्यातून सिद्ध झाल्यास न्यायालय राज्य सरकारला चौकशीचे आदेश देईनच. त्यानंतर राज्य सरकार उघड्यावर पडेल.

– मुंबई महापालिका निवडणुकीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. नगरसेवकांची सध्याची जी संख्या आहे, त्यात वाढ करण्याचा प्रयत्न असेल. भविष्यात मुंबई आणि विदर्भात राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकावर असेल.

– पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणारच. भाजपने कितीही प्रयत्न केले तरी त्याचा फायदा होणार नाही.

– तीन महिन्यांपूर्वी पक्षाची राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. येत्या निवडणुकांना कर्तुत्व असलेल्या पक्षातील तरुणांनाच संधी दिली जाणार आहे.

– भाजपमध्ये गुंडांना प्रवेश दिला जात आहे. ‘पार्टी ऑफ डिफरन्स’ म्हणवून घेतल्या जाणाऱ्या पक्षात वेगळाच डिफरन्स दिसत आहे. तुरुंगातून सुटलेले गुंड भाजपत पापमुक्तीसाठी जात आहेत. काशीला जाण्याऐवजी भाजपत जा, असे गुंड म्हणू लागले आहेत, असे विनोद सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून गुंडाचा वापर केला जात आहे.

– सत्तेचा वापर नेते फोडण्यासाठी केला जात आहे. मागील विधानसभेच्या निवडणुकीतही तसाच प्रकार केला होता. पक्षातील आऊटगोईंगचा काहीही परिणाम होणार नाही.

– महाराष्ट्रातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी काही योजना असतील, तर त्या आणण्याबाबत प्रयत्न करू शकतो.

– मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जात आहेत. त्यामुळे ते उद्ध्वस्त होतील. याबाबत केंद्राकडे पाठपुरावा केला जाईल.

– जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक प्रश्न सोडवता येऊ शकतात.

– बीड जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार असूनही मागासलेपण गेलेले नाही. भाजप अपयशी ठरले आहे.

– भाजपमधून बाजुला केले. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. कारण जनतेच्या हितासाठी राष्ट्रवादी पक्ष काम करतो. शब्द पाळणारा एकमेव पक्ष आहे.

– राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राजकारणातील चालते-बोलते विश्वविद्यापीठ आहे.

– पंतप्रधानांनी बारामतीतील काम पाहून पवार यांची स्तुती केली आहे. त्यांना सन्मान स्वीकारायलाच हवा. विरोधी पक्षनेता म्हणून माझी भूमिका वेगळी आहे. सरकार कमी पडत असेल तर
त्यांना जागे करण्याचे काम माझे आहे. सरकारविरोधात संघर्ष करण्याचे माझे काम आहे.

– राम गणेश गडकरी पुतळा वादावर सरकारने लोकभावनेचा आदर करायला हवा. सरकार मात्र जबाबदारीपासून दूर पळत आहे.

– औद्योगिक क्षेत्रात राज्याची घसरण झाली आहे.

– सरकारमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आहे. येथे पोलिसच सुरक्षित नाहीत. सत्ताधारी पक्षाचे नेतेच पोलिसांना दमदाटी करतात.

– राज्य आणि केंद्र सरकार हे घोषणाबाजांचे सरकार आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका.

गोपीनाथ मुंडे यांनी सर्वसामान्यांसाठी संघर्ष केला. तो पुढे चालूच ठेवणार. त्यासाठी आणखी आक्रमक होईल. मुंडे सर्वसामान्यांशी जोडलेले लोकनेते होते. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे हा त्यांचा
गुण माझ्या अंगी आहे.

– माझ्या वक्तृत्वात दीवंगत प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचा प्रभाव.

– कोणतेही पद राजकीय संघर्षातून मिळवावे लागते. पंकजा मुंडे यांना ते मिळाले आहे. पद मिळूनही त्यांच्याकडून अपेक्षाभंग झाला.

– तरुणांनी राजकारणाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. त्यांच्यात परिवर्तनाची ताकद आहे. त्यांनी अन्यायाविरोधात लढले पाहिजे. एक मोठी चळवळ उभी करण्याची ताकद त्यांच्यात आहे.
अधिकाधिक तरुणांनी राजकारणात यावे.