एकीकडे भाजप मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेच्या भ्रष्ट कारभारावर टीका करते आणि  दुसरीकडे त्यांच्याशीच युतीची चर्चा करते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वॉररूमचे मंगळवारी मुंबईत उद्घाटन करण्यात आले. यावेळी सुप्रिया सुळे प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. एकीकडे  भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि दुसरीकडे युतीसाठी वाटाघाटी करायच्या, यालाच ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणायचे का, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला. राष्ट्रवादीने महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराची सूत्रे सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपवली आहेत.
दरम्यान, यावेळी सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील मुलभूत सुविधांचे तीनतेरा वाजल्याची टीका केली. भाजप शिवसेनेसोबत युती करणार असेल तर रस्ते घोटाळ्याचे काय? भाजपला नेमकी कोणती पारदर्शकता अपेक्षित आहे, या प्रश्नांची उत्तरे भाजपने द्यावीत, अशी मागणीही सुळे यांनी केली. मुंबई महानगरपालिकेतील रस्ते घोटाळा भाजपच्याच खासदार आणि आमदारांनी समोर आणला. त्यामुळे आता या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे. मात्र, आता तीच भाजपा शिवसेनेशी युतीची चर्चा करत आहे, असे सुप्रिया यांनी म्हटले. शिवसेना, मनसे आता मॉर्डन होत आहे. पूर्वी ‘व्हॅलेंटाईन डे’ला ते विरोध करायचे, आता ते सेलिब्रेट करत आहेत. त्यांच्या नेत्यांची मुलंच इंग्रजी माध्यमांतील शाळांत शिकत आहेत, असा टोला सुप्रिया सुळेंनी उद्धव आणि राज ठाकरे यांना लगावला.

मुंबई महापालिकेचा कारभार ‘पारदर्शी’ असलाच पाहिजे, असा खोडा भाजपने युतीच्या चर्चेच्या पहिल्याच फेरीत घातला आहे. महापालिकेचा कारभार भ्रष्ट आहे, हे शिवसेनेला मान्य करायला लावून त्यात सुधारणेसाठी अटी घातल्या जात आहेत. जागावाटपाआधीच हा तिढा निर्माण झाल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात तातडीने चर्चा होऊन हा मुद्दा निकाली निघाल्यावरच बोलणी पुढे सरकणार आहेत. भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर शिवसेनेची कोंडी करण्याची भाजपची राजकीय खेळी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड आशीष शेलार, खासदार किरीट सोमय्या यांनी महापालिकेतील भ्रष्ट कारभाराच्या मुद्दय़ावरून शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. ‘पारदर्शी’ कारभाराच्या मुद्दय़ावरच व आमच्या अटींवरच युती करू, असे फडणवीस यांनी जाहीर केल्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महापौर शिवसेनेचाच होईल व आमच्या अटींवरच युती करू, असे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर मुंबईत युती करण्यासंदर्भात चर्चेची पहिली फेरी महामंडळाचे अध्यक्ष असलेल्या शेखर चरेगावकर यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली.