शिवसेना-भाजप स्वबळावर लढण्यास सज्ज;मुख्यमंत्री व उद्धव यांच्या भेटीची शक्यता धूसरच

शिवसेना मुंबईत भाजपला अधिक जागा देण्यास तयार नसल्याने युतीची कोंडी कायम असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीची शक्यता धूसरच आहे. फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असली तरी त्यात युतीची चर्चा झाली नसल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. शिवसेना व भाजपने स्वबळावर लढण्याची जोरदार तयारी सुरू केली असून अन्य महापालिकांमध्येही युतीची फारशी शक्यता नाही.

जिल्हा परिषद स्तरावर काही ठिकाणी स्थानिक आघाडय़ा होतील. शिवसेनेने सर्व जागांसाठी एक फेब्रुवारीला पक्षाच्या अधिकृत उमेदवारीचे अर्जवाटप करण्याचे ठरविले आहे, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. भाजपला मात्र शिवसेनेकडून वाढीव जागांची प्रतीक्षा आहे. पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट केवळ  रोखरहित व्यवहार व नीती आयोगाच्या मुद्दय़ांवर झाली. त्यात युतीबाबत चर्चा नव्हती. युतीचे सर्वाधिकार मोदी व अध्यक्ष अमित शहा यांनी फडणवीस यांनाच दिल्याने त्यांच्याशी चर्चेचा प्रश्नच नाही. मात्र युतीबाबतच्या घडामोडींची माहिती फडणवीस हे शहांना  देत असून त्यानुसार निवडणूक रणनीती तयार करण्यात येत आहे.

भाजपची मुंबईतील ताकद पाहून ६० जागा दिल्याचे शिवसेनेने सांगितल्याने भाजप नेते कमालीचे दुखावले आहेत, तर आतापर्यंत अनेकदा दुय्यम व अवमानास्पद वागणूक दिल्याने मुंबई-ठाण्यासह काही महापालिका जिंकून भाजपला ताकद दाखविण्याची हीच वेळ आहे, असे शिवसेनेला वाटत आहे. त्यामुळे हा केवळ जागावाटपाचा प्रश्न नसून एकमेकांना अद्दल घडविण्याचा व ईष्र्येचा मुद्दा झालेला आहे. उद्धव ठाकरे हे भाजपला ९५-१०० जागा देण्यास तयार नाहीत. त्यामुळे फडणवीस व ठाकरे यांची भेट किंवा दूरध्वनीवर चर्चा करूनही काहीच उपयोग होणार नाही, असे संबंधितांनी सांगितले. उभय नेत्यांमध्ये दूरध्वनीवर चर्चा झाली, तर औपचारिकता म्हणून असेल, हे त्यांनी स्पष्ट केले.

प्रभाग कार्यालयांची उद्घाटने, प्रचारमोहिमेची जोरदार तयारी सुरू ठेवली आहे. जाहीरनाम्याचे कामही लवकरच पूर्ण होईल. मुख्यमंत्री फडणवीस हे मुंबईसह सर्व महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणूक तयारीवर लक्ष ठेवून आहेत आणि आढावा घेत आहेत. स्वबळावर जाण्याखेरीज पर्याय नसल्याची जाणीव भाजपला असल्याने उमेदवारी याद्याही तयार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

शिवसेनेच्या नेत्यांची बैठक

ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याच्या तयारीसाठी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक मातोश्री निवासस्थानी मंगळवारी बोलावली होती. उद्धव ठाकरे हे ३१ जानेवारी व १ फेब्रुवारीला गोव्यात जात असून नंतर पुणे, नाशिक व अन्य भागांमध्ये दौरे करणार आहेत. आदित्य ठाकरेही दौऱ्यावर जाणार असून मंत्र्यांनी ग्रामीण भागही पिंजून काढावा, अशी सूचना ठाकरे यांनी दिल्या. पुणे, िपपरी-चिंचवड, अकोला, नाशिक, नागपूर आदी ठिकाणच्या संपर्कप्रमुख व पदाधिकाऱ्यांच्या बैठका बुधवारी बोलाविण्यात आल्या आहेत.