मुख्यमंत्र्यांची मात्र सावध भूमिका, शिवसेनेकडून काडीमोड घोषणेची वाट पाहणार

शिवसेनेकडून केवळ ६० जागांचा प्रस्ताव देऊन खिल्ली उडविण्यात आल्याने सन्मान राखण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावरच लढण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे मांडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही भाजपची ताकद वाढल्याचे मान्य करीत अधिक जागा देऊन युती करण्यास फारसे उत्सुक नाहीत. ठाकरे यांच्याकडून स्वबळाचे संकेत सोमवारी दिले जातील आणि २६ जानेवारीच्या मेळाव्यात स्पष्ट भूमिका मांडली जाईल, असे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र अजूनही सावध भूमिका घेतली असून युती न करण्याची घोषणा शिवसेनेकडूनच व्हावी, याची वाट पाहिली जाणार आहे.

शिवसेनेने केवळ ६० जागांचा प्रस्ताव दिल्याने आणि ठाकरे यांनीही त्याहून अधिक जागा देण्याची तयारी न दाखविल्याने युतीची चर्चा थांबली आहे. त्यातच भाजपची ताकद पाहून जागा दिल्याचा सणसणीत टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला. या पाश्र्वभूमीवर स्वबळावरच लढावे लागेल, हे दिसू लागल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘वर्षां’ निवासस्थानी मुंबईतील भाजप आमदार, खासदार, मंत्र्यांची बैठक बोलाविली आणि रात्री उशिरा प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्यांशीही चर्चा केली. केंद्रीय राज्यमंत्री पीयूष गोयल यांच्यावर पक्षाने मुंबईतील निवडणुकीची जबाबदारी टाकली असून तेही या वेळी उपस्थित होते. मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्यासह अन्य नेत्यांनी शिवसेनेच्या प्रस्तावावर संतप्त मते मुख्यमंत्र्यांपुढे व्यक्त केली. भाजपची ताकद वाढली असताना आणि केंद्रात व राज्यात सत्ता असताना शिवसेनेने जाणीवपूर्वक डिवचले आहे. त्यांना प्रत्युत्तर देऊन अद्दल घडविली नाही आणि युती केली, तर भाजपने पराभवाच्या भीतीने नमते घेतले, असे चित्र निर्माण होईल. त्यापेक्षा पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात स्वबळावर लढल्यास ७० ते १०० पर्यंत जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त झाल्याने आता युतीची चर्चाच नको, अशी मते काही सदस्यांनी मांडल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनीही आता युतीसाठी ठाकरे यांच्याशी चर्चा न करण्याचे ठरविले असून शिवसेनेकडून सन्मानपूर्वक किमान ९५-१०० जागांचा प्रस्ताव आला, तरच चर्चा होऊ शकते, असे भाजपमधील उच्चपदस्थांनी सांगितले.त्यामुळे भाजपने स्वबळावर लढण्याच्या तयारीला वेग दिला असून जाहीरनाम्याबाबत व बूथरचनेबाबत विस्तृत चर्चा झाली. इच्छुक उमेदवारांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत.

  • भाजपला ‘जागा’ दाखवून देण्याची हीच वेळ व संधी असल्याचे ठाकरे व शिवसेना नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे मुद्दाम भाजपला डिवचले जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात सोमवारी मेळावा होणार असून ठाकरे हे त्यात स्वबळाबाबत स्पष्ट संकेत देणार असल्याचे समजते. त्यानंतर २६ जानेवारीला सर्व प्रभागातील प्रमुखांचा मेळावा गोरेगावच्या एनएससी मैदानावर होणार असून त्या दिवशी शिवसेना शक्तिप्रदर्शन करून स्वबळाची घोषणा करणार असल्याचे संबंधितांनी स्पष्ट केले.