सेना नगरसेवकाच्या तक्रारीवरून तीन नगरसेवकांना नोटिसा

आचारसंहिता जारी असताना दहिसरमधील उद्यानात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावरून  पालिकेच्या विभाग कार्यालयाने माजी महापौरांसह शिवसेनेच्या तीन नगरसेवकांवर कारणे दाखवा नोटीस बजावली असून शिवसेनेच्या याच भागातील नगरसेवकाच्या तक्रारीवरून या तिघांना नोटिसा बजावण्यात आल्याने सेनेतील वाद चव्हाटय़ावर आला आहे.

काही सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन मकरसंक्रांती निमित्त १४ जानेवारीला दहिसरमधील एलआयसी कॉलनीत कर्मयोग उद्यानात  स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास माजी महापौर, शिवसेनेच्या नगरसेविका शुभा राऊळ, नगरसेविका शीतल म्हात्रे आणि नामनिर्देशित नगरसेवक अवकाश जाधव उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी हे खासगी उद्यान ताब्यात घेऊन पालिकेने त्याचे नूतनीकरण केले होते. या कार्यक्रमात उद्यानाचे उद्घाटन करण्यात आल्याचा दावा करीत शिवसेनेचेच नगरसेवक अभिषेक घोसाळकर याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. आचारसंहिता कक्षप्रमुख आणि पालिकेच्या आर-उत्तर विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विजय कांबळे यांच्याकडे अभिषेक घोसाळकर यांनी आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत विजय कांबळे यांनी मंगळवारी या तिघांविरुद्ध कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

शुभा राऊळ, शीतल म्हात्रे आणि अवकाश जाधव या तिघांनीही बुधवारी या नोटीसवरील आपले उत्तर विजय कांबळे यांच्याकडे सादर केले.

जीवन विमा नगर असोसिएशन आणि रहिवाशी संघ यांनी मकर संक्रांतीनिमित्त १४ जानेवारी रोजी कर्मयोगी उद्यानात आभार प्रदर्शन व स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी दत्ताराम कोसंबे यांच्या आमंत्रणानुसार आम्ही या कार्यक्रमास उपस्थित होतो. या कार्यक्रमात राजकीय पक्षाचा बॅनर, झेंडे लावण्यात आले नव्हते. तसेच तेथे राजकीय घोषणाबाजीही करण्यात आली नव्हती. कोनशिला बसविणे वा फित कापणे अशा प्रकारचा कार्यक्रमही झाला नाही, असे या तिघांनी सादर केलेल्या उत्तरात म्हटले आहे.