दादरमध्ये पुन्हा पताका फडकावण्यासाठी सेनेने कंबर कसली, मनसेची ‘वॉररुम’; भाजपचीही कुमक तयार

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात धडक देत दादरमध्ये सातही मतदारसंघ खिशात घालण्याचा चमत्कार मनसेने पाच वर्षांपूर्वी केला होता. दरम्यानच्या काळात मनसेला घरघर लागल्याने शिवसेनेने या किल्ल्यावर पुन्हा पताका फडकविण्यासाठी कंबर कसली आहे. दुसरीकडे अनेक वष्रे युतीमुळे सेनेकडे असलेला हा किल्ला सर करण्यासाठी भाजपने कुमक तयार ठेवली आहे. अशा स्थितीत वॉररूमची मदत घेत मनसेही कामाला लागल्याने या भागात तिरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे.

माहीम-दादर या परिसरात गेल्या महापालिका निवडणुकांमध्ये १८१ ते १८७ या मतदारसंघात मनसेच्या विजयी पताका झळकल्या होत्या. यातील पाच ठिकाणी सेनेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर तर दोन मतदारसंघात काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यातील एका मतदारसंघात काँग्रेसमध्ये जाऊन सेनेत घरवापसी केलेल्या आमदार सदा सरवणकर यांच्या मुलाने – समाधान सरवणकर यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. प्रभादेवी येथे झालेल्या मनसे-काँग्रेस-सेनेच्या अटीतटीच्या लढतीत मनसे विजयी झाली होती.

या विभागातील उमेदवारीसाठी महिला संघटक व शाखाप्रमुखांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. माजी महापौर मिलिंद वैद्य तसेच विशाखा राऊत यांना या भागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. विभागप्रमुख असलेले सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान यांनाही उमेदवारी मिळू शकेल.

मनसेनेही राज ठाकरे यांच्या हस्ते वॉररूमचे उद्घाटन करून मतांची बेगमी करण्यास सुरुवात केली आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्याव्यतिरिक्त इतर नगरसेवकांनी पाच वर्षांत विशेष छाप न पाडल्याने मनसे नव्या उमेदवारांच्या शोधात आहे; मात्र मनसेने गेल्या पाच वर्षांत या विभागात केलेली कामे व समाजमाध्यमांचा वापर करत दादरमध्ये ‘इंजिन’ला वेग देण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी ‘अजून वेळ गेलेली नाही’ या घोषवाक्याचे इंधन मनसेने इंजिनमध्ये भरले आहे. यात भाजप मागे नाही. दादरमध्ये मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी स्थानिक पातळीवर अनेक कार्यक्रम हाती घेतले. आता किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा ओक-सोमय्या यांच्या नावाने मराठी कार्ड खेळवण्याचाही विचार भाजप करत आहे. सेनेतून भाजपात प्रवेश गेलेले सुरेश गंभीर यांची कन्या शीतल गंभीर यांनाही उमेदवारी मिळू शकते. युती झाली तर हे विभाग सेनेला द्यावे लागणार असल्याने याविषयी उघडपणे बोलण्यास भाजप नेते तयार नाहीत; मात्र युती झाली नाही तर भाजपने राज्यातील सत्ता व पारदर्शक कार्ड यासोबत मराठी नावांवर जोर द्यायचे ठरवले आहे.

चर्चेतील नावे    

प्रभागांची पुनर्रचना व आरक्षण बदलल्याने १८१ क्रमांकाचा माहिम खाडी, किल्ला परिसर १८२ क्रमांकाच्या प्रभागात गेला असून त्यावर कोणतेही आरक्षण नाही. या मतदारसंघातून मनसेकडून श्रद्धा पाटील, त्यांचे पती राजेश पाटील, राजन पारकर, जयेश आकरे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. सेनेकडून अभय तामोरे, नितीन मेहेर, मिलिंद तांडेल, शशी फडते अशी अनेक नावे चर्चेत होती. मात्र इथून माजी महापौर मिलिंद वैद्य यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. भाजपकडून विलास आंबेकर, चारुहास हंबिरे या नावांची चर्चा आहे. प्रभाग क्रमांक १९० मागासवर्ग महिलांसाठी आरक्षित असून तिथे सध्याचे नगरसेवक विरेंद्र तांडेल यांची पत्नी आरती तांडेल आणि संगीता घळशी यांनी नावे चर्चेत आहेत. सेनेकडून संदीप देवळेकर यांची पत्नी दर्शना तसेच रोहिता ठाकूर तर भाजपाकडून शीतल गंभीर-देसाई यांना उमेदवारीची शक्यता आहे.