शिवसेना भ्रष्टाचारी नसल्याची भाजपची सारवासारव; मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणाची मागणी

‘शिवसेना किंवा शिवसेना नेते भ्रष्टाचारी असल्याचे आमचे म्हटलेच नाही,’ असे खळबळजनक विधान करीत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुंबई महापालिकेतील कंत्राटदारांच्या भ्रष्टाचाराबद्दल व सिंडीकेटबद्दल भाजपने आक्षेप घेतला असल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेविरोधात स्वबळावर लढल्यास फारसे यश न मिळण्याची भीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाटू लागल्याने भाजपने माघार घेत ही कोलांटउडी मारली असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. उभय पक्षातील नेत्यांची बेताल वक्तव्ये आणि ‘सामना’ मुखपत्रातील लिखाणावरुन एकमेकांना दोष देत युतीची चर्चा तूर्तास थांबविण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील चर्चेनंतरच युतीची बोलणी पुन्हा सुरु होऊ शकणार आहेत.

मुंबई महापालिकेत ‘माफिया राज’ आहे, ‘मातोश्री’ वर पैसे पोचविले जातात, असे आरोप खासदार किरीट सोमय्या यांनी केले होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भ्रष्टाचारी कारभारावरुन शिवसेनेला ‘लक्ष्य’ केले होते आणि ‘पारदर्शी’ कारभारासाठी आग्रह धरला आहे.

मात्र आता शिवसेनेने युतीची चर्चा थांबविल्याने भाजपने माघार घेत शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेच नव्हते. कंत्राटदारांच्या भ्रष्टाचाराबद्दल भाजप नेते बोलले होते. ते शिवसेना नेत्यांना त्याबद्दल आक्षेप का, असा सवाल तावडे यांनी केला.

युती करण्याची भाजपला तीव्र इच्छा असून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ज्येष्ठ मंत्री प्रकाश मेहता, मी आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे चर्चेत सहभागी झाले. पण शिवसेनेकडून रामदास कदम, सुभाष देसाई यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांऐवजी  विभागप्रमुख, आमदार, खासदार यांना चर्चेसाठी पाठविण्यात आले. पण आम्ही तो मुद्दा प्रतिष्ठेचा केला नाही. उलट आमदार अनिल परब यांनी १४ कलंकित मंत्र्यांचा मुद्दा उपस्थित करुन अशा मंत्र्यांना चर्चेला पाठविल्याची टिप्पणी केली. प्रसिध्दीमाध्यमातून युतीची चर्चा आणि आमच्या नेत्यांवर टीकाटिप्पणी खपवून घेतली जाणार नाही, असे तावडे यांनी स्पष्ट केले.

आमची यादी तयार

शिवसेनेला युती करायची आहे की नाही, असा सवाल उपस्थित करीत भाजपला हव्या असलेल्या ११४ जागांची यादी स्वीकारण्यासही शिवसेनेने नकार दिला असल्याची माहिती तावडे यांनी दिली. भाजपने स्वबळावर लढण्याची तयारी सुरु ठेवली असून २२७ उमेदवारांची यादी तयार करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.  शिवसेनेला सोमय्या व शेलार यांच्या वक्तव्यांवर आक्षेप असून भाजपला अनिल परब व खासदार संजय राऊत यांच्या टीकाटिप्पणीबद्दल राग आहे.

सोमय्यांची पुन्हा टीका

खासदार किरीट सोमय्या यांच्या वक्तव्यांवर शिवसेनेने आक्षेप घेत बोलणी थांबविली असली तरी मुंबई ‘माफिया मुक्त’ करणार असल्याचा पुनरुच्चार सोमय्या यांनी केला.

..नंतरच चर्चा

भाजप नेत्यांच्या आरोपांच्या फैरी सुरु असेपर्यंत युतीची चर्चा सुरु न करण्याचा आणि नोटाबंदीविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारविरोधात भूमिका मांडत राहण्याचे शिवसेनेने ठरविले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यातील चर्चेनंतरच तिढा सुटण्याची शक्यता आहे. चर्चा सुरु करण्याचा निरोप अद्याप आलेला नसल्याचे खासदार अनिल देसाई यांनी रात्री उशिरा सांगितले. तर  भाजप नेत्यांच्या वक्तव्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांचा पाठिंबा आहे की नाही, हे त्यांनी सांगावे आणि आपल्या नेत्यांना आवर घालावा, असे आमदार अनिल परब यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेला भीती?

भाजपने विधानसभा निवडणुकीतील निकालानुसार भाजपची सरशी झालेल्या ११४ प्रभागांची मागणी शिवसेनेकडे केली आहे. या जागांवर शिवसेनेचे ४० नगरसेवक आहेत. भाजपशी युती केल्यास व या जागा भाजपला दिल्यास हे नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी भीती शिवसेनेला सतावत असल्याचे भाजप नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे भाजपला हव्या असलेल्या जागांची यादीही स्वीकारण्यात येत नसून काहीतरी कारणे काढून शिवसेनेने चर्चा थांबविल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.