मुंबई महापालिका निवड़णुकीत भाजपसोबत युतीची चर्चा अजून सुरूच आहे. त्यापूर्वीच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वचननामा जाहीर केला. मुंबईकरांना करमुक्त करणार असून आरोग्य सुविधाही मोफत दिली जाणार आहे, अशी घोषणा ठाकरे यांनी केली. आमच्या घोषणा म्हणजे चुनावी जुमला नाही, असे सांगत त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

मुंबई महापालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे. या रणधुमाळीत भाजप-शिवसेना युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षांमध्ये चर्चेच्या काही फेऱ्याही झाल्या आहेत. पण अद्यापही युतीवर शिक्कामोर्तब झाले नाही. युतीची चर्चा सुरू असली तरी पक्षपातळीवर आपापल्या परीने दोन्ही पक्ष जाहीरनामा-वचननामा तयार असल्याचे सांगत आहेत. तसेच दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर टीका करण्याची संधीही सोडत नाहीत. त्याचदरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज, गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मुंबई महापालिकेसाठी आपल्या पक्षाचा वचननामा काय असेल, याची रुपरेषा स्पष्ट केली. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वचननाम्याची रुपरेषा कशी असेल, हे सांगताना मुंबईकरांवर घोषणांचा पाऊस पाडला जाईल, असे संकेत दिले आहेत. मुंबईतील ५०० ते ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करसवलत देण्यात येणार आहे. तसेच मुंबईकरांसाठी मोफत आरोग्य सुविधा देण्यात येईल, असे वचन त्यांनी दिले आहे. यावेळी त्यांनी जाहीरनाम्यात बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजनेचा समावेश असेल, अशीही घोषणा केली आहे.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवरही टीकास्त्र सोडले. आमच्या घोषणा म्हणजे चुनावी जुमला नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली. भाजप-शिवसेना युतीबाबत विचारलेल्या प्रश्नांवर मात्र, त्यांनी स्पष्टपणे सांगितले नाही. युतीबाबतची चर्चा अद्याप माझ्यापर्यंत आली नाही, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर युतीची चर्चा सकारात्मक झाली आहे. ती आता होकारात्मक होऊ द्या, असे सांगून त्यांनी युती करण्यासाठी अनुकूल असल्याचे संकेत स्पष्टपणे दिले आहेत.