मुंबई महानगरपालिका निवडणुकीबद्दलची युतीची चर्चा थांबल्याचे संकेत शिवसेनेकडून देण्यात आले आहेत. भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येणाऱ्या बेताल वक्तव्यांमुळे शिवसेना नाराज असल्याची माहिती मिळते आहे. आम्ही आमचे म्हणणे आणि भूमिका मांडली आहे, आता पुढचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा आहे, असे शिवसेना नेते अनिल परब यांनी म्हटले आहे. यासोबतच पारदर्शकतेवरील चर्चेला आरोप असणारे नेते येतात, असे म्हणत अनिल परब यांनी भाजपला टोला लगावला आहे.

‘एकीकडे मुख्यमंत्री युतीची भाषा करतात आणि दुसरीकडे भाजपचे नेते शिवसेनेवर आरोप करतात. हा भाजपचा दुटप्पीपणा आहे. भाजपच्या नेत्यांनी बेताल वक्तव्ये थांबवावीत,’ असे अनिल परब यांनी म्हटले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पारदर्शकतेच्या मुद्यावर युती होईल, असे वारंवार भाजपच्या नेत्यांकडून सांगितले जाते आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी पारदर्शकतेचा मुद्दा पुढे करणाऱ्या भाजपच्या नेत्यांवर शिवसेना नेते अनिल परब यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. ‘गेल्या दोन वर्षांमध्ये भाजपच्या १३ नेत्यांवर विविध आरोप झाले. युतीच्या चर्चेसाठी येत असलेल्या तावडे, प्रकाश मेहता आणि आशिष शेलार यांच्यावरही आरोप झाले आहेत. त्यामुळे आम्हाला पारदर्शकतेची सुरुवात करायची असती, तर तिथून केली असती,’ असे अनिल परब यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले.

‘आम्ही आमची नाराजी पक्षप्रमुखांकडे व्यक्त केली आहे. पक्षप्रमुखांवर होणारे आरोप खपवून घेणार नाही. शिवसेनेने सामनामधून कोणत्याही नेत्यावर वैयक्तिक टीका केलेली नाही. भाजपचे नेते वारंवार शिवसेनेला लक्ष्य करतात. भाजपच्या या नेत्यांना मुख्यमंत्र्यांचे समर्थन आहे का ?, नसेल तर मग मुख्यमंत्री या नेत्यांना आवर का घालत नाहीत ?,’ असे प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केले. आम्ही आमची भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडली आहे. आता मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा, अशा शब्दांमध्ये अनिल परब यांनी दोन्ही पक्षांमध्ये फारसे काही आलबेल नसल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान युतीची चर्चा शिवसेनेमुळे थांबल्याचे भाजपच्या सूत्रांनी म्हटले. भाजपचे आमदार असलेल्या अनेक ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक आहेत. या जागांसाठी भाजप आग्रही आहे. मात्र तसे झाल्यास शिवसेनेला बंडखोरीची भीती वाटते. त्यामुळेच शिवसेनेने युतीची चर्चा थांबवली, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले आहे.