भाजपने मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठीच्या निवडणुकीतून अनपेक्षितरित्या माघार घेतल्यामुळे मुंबईत शिवसेनेचाच महापौर होणार हे निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजप महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक लढवणार नसल्याचे घोषित केले. त्याबरोबरच भाजप पालिकेतील स्थायी, सुधार आणि बेस्ट या लाभाच्या समित्यांसाठी शिवसेनेशी सामना करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मुंबईत महानगपालिकेतील शिवसेनेची सत्ता अबाधित राहणार आहे. त्यामुळे शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर हे मुंबईचे नवे महापौर असतील. तर हेमांगी वरळीकर या मुंबईच्या  उपमहापौरपदी विराजमान होतील.

मात्र, आता मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर भाजपने शिवसेनेच्या विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी मैत्रीपूर्ण माघार घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी एकमेकांवर अत्यंत खालच्या पातळीला जाऊन आणि शेलक्या शब्दांत टीका केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील भाजपशी काडीमोड घेताना भविष्यात कोणत्याही परिस्थितीत भाजपशी युती करणार नाही, अशी गर्जना केली होती. मात्र, मतदारांनी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न दिल्यामुळे दोन्ही पक्षांपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेप्रमाणे हे दोन्ही पक्ष एकत्र आले असते तर शिवसेना आणि भाजपची तुटलेली युती हे निवडणुकांपुरते रचलेले कुंभाड आहे, या विरोधकांच्या आक्षेपाला बळ मिळाले असते. त्यामुळे दोन्ही पक्षांना सत्ता स्थापनेसाठी थेट युती करणे शक्य नव्हते. याशिवाय, महापौरपदाच्या लढतीत अपक्ष उमेदवार आणि मनसेच्या उमेदवारांचे पाठबळ शिवसेनेलाच मिळण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे महापौरपदाच्या लढतीत पराभव झाल्यास पालिकेत शिवसेनाच भाजपपेक्षा काहीशी वरचढ असल्याचा संदेश जाण्याची शक्यता होती. याशिवाय, शिवसेनेला आणखी डिवचल्यास राज्य सरकार धोक्यात येण्याचाही धोका होता. त्यामुळे ही कोंडी टाळण्यासाठी भाजपने शिवसेनेचा मार्ग मोकळा करून दिला असण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. याशिवाय, पालिकेत लाभाची कोणतीही पदे नसल्यामुळे भाजपच्या नगरसेवकांना शिवसेना सध्या राज्य सरकारच्या निर्णयांवर सोयीस्कर भूमिका घेते, तसाच काहीसा प्रकार भाजपलाही पालिकेत करता येणे शक्य आहे.