उद्धव ठाकरे यांचा विभागप्रमुखांना दम

तिकीटवाटपावरून विभागप्रमुख आणि पक्षातील बुजूर्ग, निष्ठावान नेत्यांमध्ये असलेल्या संघर्षांचे पडसाद गुरुवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत उमटले. भाजपबरोबर युती होणार की नाही याकडे डोळे लावून बसण्यापेक्षा आपण सुचविलेल्या इच्छुक उमेदवाराच्या विजयाची वाट कशी सुकर होईल याकडे लक्ष द्यावे, असे सुनावत शिफारस केलेल्या उमेदवारांचा पराभव झाला तर त्याची जबाबदारीही घेऊन पद सोडण्याचीही तयारी ठेवा, असा सज्जड दमच यावेळी ठाकरे यांनी मुंबईतील सर्व विभागप्रमुखांना दिला.

गेल्या काही वर्षांपासून शिवसेना नेते आणि शिवसेना विभागप्रमुख यांच्यामध्ये संघर्ष टिपेला पोहोचला होता. गेली अनेक वर्षे शिवसेनाप्रमुखांच्या आदेशाचे पालन करीत आणि खस्ता खात शिवसेनेच्या नेते पदापर्यंत पोहोचलेल्या अनेक बुजूर्ग नेत्यांची विभागप्रमुखांकडून अवहेलना होऊ लागली आहे. त्यामुळे शिवसेना नेते आणि विभागप्रमुख यांच्यामध्ये संघर्ष वाढून उभयतांमधील दरी रुंदावू लागली आहे. नेते मंडळींच्या समर्थकांची तिकिटे कापण्याची तयारी विभागप्रमुखांनी केली असून वार्धक्याकडे झुकलेल्या काही नेते मंडळींनी तीन दिवसांपूर्वी ही बाब उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागप्रमुखांना गुरुवारी दुपारी ‘मातोश्री’वर बोलावून घेतले होते.

उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार विभागप्रमुखांनी गेल्या आठवडय़ात आपल्या विभागातील निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची यादी ‘मातोश्री’वर सादर केली आहे. पालिका निवडणुकीच्या उमेदवारीबाबत बैठक असल्याचा समज झालेले विभागप्रमुख धावतपळत ‘मातोश्री’वर दाखल झाले. मात्र दोन विभागप्रमुख विलंबाने पोहोचले. त्यांच्या अनुपस्थितीत दुपारी सव्वाबाराच्या सुमारास ही बैठक सुरू झाली.

बैठकीच्या सुरुवातीपासूनच उद्धव ठाकरे यांनी विभागप्रमुखांची हजेरी घ्यायला सुरुवात केली.

शिवसेनेमध्ये विभागप्रमुखांना महत्त्व आहे. निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या नावांची शिफारस करण्याची जबाबदारी विभागप्रमुखांवर आहे. त्याप्रमाणे विभागप्रमुखांनी उमेदवारांची नावे कळविली आहेत. विभागप्रमुखांनी शिफारस केल्याप्रमाणे उमेदवारी देण्यात येणार आहे. त्यामुळे या सर्व उमेदवारांच्या विजयाची जबाबदारी विभागप्रमुखांचीच आहे. त्यात कोणताही कसूर होता कामा नये. अन्यथा विभागप्रमुखपद सोडण्याची तयारी ठेवावी लागेल, अशी तंबी उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिल्याचे समजते.

महिला संघटक आणि विभागप्रमुखांना उमेदवारी नाही

उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी विभागप्रमुखांवर आहे. त्यामुळे महिला संघटक आणि विभागप्रमुखांना उमेदवारी मिळणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. भाजपबरोबर युती होईल अथवा नाही याचा विचार करू नका. आपल्या विभागातील नाव सुचविलेल्या उमेदवाराचा विजय कसा होईल यासाठी रणनीती ठरवा आणि सर्वाना सोबत घेऊन कामाला लागा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले. कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेवर भगवा झेंडा फडकलाच पाहिजे. त्यामुळे विभागप्रमुख, खासदार, आमदार यांनी मुंबई सोडू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. जेमतेम अर्धातास चाललेल्या या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे सर्वच विभागप्रमुख गारद झाले.