‘करून दाखवू’च्या यादीत ठाण्यात प्रगतिपथावर असलेल्या प्रकल्पांचा समावेश

ठाणे महापालिकेची आगामी निवडणूक लक्षात घेऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी शहरवासीयांवर आश्वासनांचा पाऊस पाडला खरा; मात्र त्यात फारसे नवे काही नसल्याचे दिसून येत आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या, वा प्रगतिपथावर असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचाच समावेश शिवसेनेच्या या वचननाम्यात आहे. त्यामुळे आयुक्तांच्या कामावर ‘नजर’ ठेवून शिवसेनेने ठाण्यातील आश्वासनपूर्तीची परीक्षा आधीच सोपी करून घेतल्याचा सूर उमटत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून ओळखले जाणारे ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळाच्या सुरुवातीच्या काळात शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचे त्यांच्याशी सातत्याने खटके उडाले. मात्र, जयस्वाल यांचा कामाचा धडाका आणि त्यांना राज्य सरकारची लाभत असलेली साथ लक्षात घेऊन शिवसेनेने त्यांच्यासोबत जुळवून घेण्यास सुरुवात केली. गेल्या दीड वर्षांत शहरातील रस्त्यांच्या रुंदीकरणाची मोठी मोहीम राबवीत संजीव जयस्वाल यांनी विकासकांच्या माध्यमातून काही मोठय़ा प्रकल्पांची पायाभरणी केली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मातोश्री निवासस्थानी ठाणेकरांवर आश्वासनांचा पाऊसच पाडताना त्याच प्रकल्पांतील काही प्रकल्पांचा ‘करून दाखवू’च्या यादीत उल्लेख केला.

ही कामे आयुक्त जयस्वाल यांच्या कारकीर्दीचे वैशिष्टय़ म्हणून ओळखली जातात. असे असताना आयुक्तांच्या या कार्यनाम्याचे रूपांतर शिवसेना नेत्यांनी मोठय़ा चलाखीने वचननाम्यात केल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांची रविवारी धांदल उडाल्याचे दिसत होते!

‘शिवसेनेच्या मंजुरीनेच आयुक्तांचा धडाका’

दरम्यान, शिवसेनेने जाहीर केलेल्या ‘ठाणे व्हिजन’मधील बहुतांश कामे सुरू झाली असली आणि जयस्वाल यांचा पाठपुरावा निर्णायक ठरला असला तरी शिवसेनेच्या पाठिंब्यानेच ही कामे होत आहेत, असा दावा पक्षातील एका बडय़ा नेत्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.

संजीव जयस्वाल यांच्या कोणत्याही विकासकामात शिवसेनेने कधी अडथळा आणला नाही; उलट सर्वसाधारण सभेत पक्षाचे नगरसेवक जयस्वाल सांगतील त्या शहरविकास कामांवर मंजुरीची मोहर उमटवित होते. त्यामुळे आयुक्तांचा कार्यनामा हे सत्ताधारी म्हणून शिवसेनेच्या पाठिंब्याचे फलित नाही का, असा प्रश्न या नेत्याने केला.

‘चर्चेची वेळ निघून गेली’

‘भाजपकडून मला युतीबाबत प्रस्ताव आलेला नाही, युतीच्या चर्चेची वेळ निघून गेली आहे’, असे उद्गार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी ‘मातोश्री’ येथे पत्रकारांशी बोलताना काढले. मात्र, त्याचवेळी, ‘नोटाबंदीनंतरही डेडलाइन सातत्याने बदलल्या होत्या’, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

मुख्यमंत्र्यांची सावध भूमिका

पक्षाचा सन्मान राखण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावरच लढण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे रविवारी मांडली. मुख्यमंत्री फडणवीस यांची सावध भूमिका मात्र कायम आहे.

untitled-34

untitled-35