शिवसेना आणि भाजपमध्ये युतीची चर्चा थांबली असतानाच भाजप नेते आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. भाजपने कंत्राटदारांवर केलेली टीका शिवसेनेला का झोंबते असा खोचक प्रश्न उपस्थित करत विनोद तावडेंनी सेनेवर बाण सोडला आहे.

शुक्रवारी शिवसेना आणि भाजपमध्ये युतीविषयी चर्चा होऊ शकली नाही. भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येणाऱ्या बेताल वक्तव्यांमुळे शिवसेना नाराज असल्याची चर्चा आहे. यावर भाजप नेते विनोद तावडे यांनी शिवसेनेवर पलटवार केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना तावडे म्हणाले, आशीष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केलेली नाही. त्यांनी युतीतील चर्चेवर भर दिला होता. किरीट सोमय्याही युतीसाठी अनुकूल होते. मात्र सामनामधून मोदींवर टीका झाल्यावर भाजपने प्रत्युत्तर दिले याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

पारदर्शक कारभारावर भर देणा-या भाजपकडून आरोप असलेले नेते युतीच्या चर्चेसाठी येतात असा टोला शिवसेनेने लगावला. यावर तावडे म्हणाले, आम्ही पहिल्या दिवसापासून युतीसाठी सकारात्मक आहोत. मुंबई महापालिकेची सत्ता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हाती जाऊ नये असे आम्हाला वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. युतीबाबत दोन बैठका झाल्या. त्यावेळी शिवसेनेला चर्चेसाठी येणा-या नेत्यांवर आक्षेप नव्हता. मग आता सेनेला का उपरती झाली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

शुक्रवारी आमच्यात युतीची चर्चा होणार होती. पण चर्चा होणार नसल्याची माहिती आम्हाला प्रसारमाध्यमांमधून कळाली. युतीची चर्चा या बैठकीतून होते, प्रसारमाध्यमांवरुन नाही असे त्यांनी सेनेला सुनावले आहे. युतीसाठी भाजपने ज्येष्ठ नेते पाठवले होते. पण शिवसेनेकडून नेत्यांची दुसरी फळी चर्चेसाठी आली. यावरही आम्ही आक्षेप घेतला नाही असे त्यांनी म्हटले आहे.