मुंबई- महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी. विविध व्यापारांचे सत्ताकेंद्र म्हणून मुंबईकडे पाहिले जाते. त्यामुळेच जगाच्या नकाशावर मुंबईने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्व जाती, धर्म, पंथांच्या नागरिकांना सामावून घेणाऱ्या महानगरी मुंबईत नागरी सेवा-सुविधा पुरविणाऱ्या मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय समीकरणे बदलली असून गेली २५ वर्षे एकमेकांच्या हातात हात घालून निवडणुकांना सामोऱ्या जाणाऱ्या शिवसेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीने परस्परांशी काडीमोड घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीत रंगत आली आहे. गेली २० वर्षे फडकणारा महानगरपालिकेवरील शिवसेनेचा भगवा पुन्हा फडकणार की, भाजपचे कमळ फुलणार याची उत्सुकता आहे.

एकेकाळी मराठी माणसाच्या हक्कासाठी मुंबईत शिवसेनेचा आवाज बुलंद होऊ लागला आणि दाक्षिणात्यांविरोधात ‘बजाव पुंगी, हटाव लुंगी’चा नारा देत शिवसैनिकांनी आंदोलने केली. त्यानंतर ‘मुंबई तुमची, भांडी घासा आमची’ असा टोला मारणाऱ्या गुजराती समाजाविरोधात शिवसेना उभी ठाकली. आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेमागे अवघी मराठी सेना उभी राहिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भावनिक आवाहनामुळे मराठी, विशेषत: कोकणपट्टय़ातून मुंबईत आलेला मराठी माणूस शिवसेनेकडे आकर्षित झाला आणि शिवसेनेची ताकद हळूहळू वाढत गेली. तेव्हापासून मुंबईत शिवसेनाप्रमुखांचा मोठा दबदबा होता. केवळ एका गर्जनेत मुंबई बंद होत होती. कालौघात शिवसेना आणि भाजपची युती झाली आणि हे दोन्ही मित्रपक्ष एकत्रित निवडणुका लढवू लागले. गेली २५ वर्षे शिवसेना-भाजप युतीने महापालिकेची सत्ता आपल्याकडे राखली होती. वैधानिक समित्या मिळविण्यासाठी भाजपने शिवसेनेशी केलेल्या वाटाघाटी, महत्त्वाच्या मलईदार समित्या आपल्याकडे राखताना शिवसेनेने भाजप विरोधात केलेली व्यूहरचना, निवडणुकांच्या वेळी जागावाटपावरून उभयतांमध्ये झालेली रस्सीखेच असे अनेक प्रकार गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईकरांना पाहायला मिळाले. गेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या लाटेत भाजपने घवघवीत यश मिळविले आणि या निवडणुकीत शिवसेनेलाही मोठे यश मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळे लोकसभेपाठापाठ आलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जागा वाटपात अधिक जागांची मागणी केली आणि शिवसेनेने त्यास नकार दिला. अखेरच्या क्षणापर्यंत जागावाटपावरून उभयतांमध्ये रस्सीखेच सुरूच होती. अखेर युती तुटली आणि शिवसेना, भाजपने स्वबळावर निवडणूक लढविली. भाजपला मोठे यश मिळाले. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेने भाजपला पािठबा दिला. आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानेही उभयतांमध्ये जागावाटपाच्या चर्चेचे ‘नमन’ घडले. दोन्ही पक्षांतील शंकासुरांनी आपापल्या मागण्या एकमेकांपुढे मांडल्या. पण उभयतांमध्ये ‘पारदर्शकते’वरून मानापमान नाटय़ रंगले. अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तोडून टाकल्याचे जाहीर केले आणि दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले. पूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे युतीचे मुख्य लक्ष्य होते. मात्र आता हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभांमध्ये परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्याचा धडाका लावला. मुंबईला पाटण्याची दिलेली उपमा, पालिकेच्या कारभारावरून एकटय़ा शिवसेनेला केलेले लक्ष्य, पालिका निवडणुकीसाठी राज्य सरकारच्या कामांचा हवाला देत मतदारांना केलेले आवाहन अशा अनेक बाबींवरून मुख्यमंत्र्यावर शिवसेना पक्षप्रमुखांनी टीकास्त्र सोडले आणि गेले काही दिवस मुंबईकरांना या कलगीतुऱ्याचे ‘याचि देही याचि डोळा’ दर्शन घडले.

पालिकेतील सत्ताधाऱ्यांप्रमाणेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत बिघाडी झाली. दोन्ही पक्ष स्वबळावर रिंगणात उतरले. गेल्या पाच वर्षांमध्ये खंबीर विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला आक्रमक होताच आले नाही. अंतर्गत गटबाजी आणि फिरता चषक बनलेले विरोधी पक्षनेतेपद यामुळे काँग्रेसला पालिकेत पकड घेताच आली नाही. नालेसफाई, रस्ते घोटाळा उघडकीस आल्यानंतर विरोधी पक्षाने सत्ताधारी आणि प्रशासनाविरोधात रान उठविण्याची गरज होती; परंतु काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी केलेला विरोध तितकासा प्रखर नव्हता. सत्ताधारी आणि प्रशासनाचा कारभार, एकामागून एक प्रकाशात आलेली घोटाळ्यांची मालिका यावरून विरोधकांना मुंबईकरांमध्ये जनजागृती करीत पालिकेमध्ये सत्ताबदल घडविण्याची संधी होती; परंतु अभ्यासू वृत्ती, परस्परांमधील समन्वय आणि नेतृत्व यांचा अभाव, तसेच विरोधी पक्षांना लागलेली अंतर्गत गटबाजीची वाळवी यामुळे विरोधकांना ना सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवता आला ना प्रशासनावर. केवळ प्रभाग समितीचे पद अथवा समित्यांचे सदस्यपद कसे मिळेल याकडेच विरोधी पक्षांच्या नगरसेवकांचे अधिक लक्ष होते. गेली पाच वर्षांमध्ये सत्ताधाऱ्यांना निर्णय बदलण्यास विरोधकांनी भाग पाडले असा एकही प्रसंग आठवत नाही. सत्ताधाऱ्यांच्या तुलनेत संख्याबळ कमी असले तरी विरोधकांना ठोस भूमिका घेताच आली नाही. पालिका निवडणूक जवळ आल्यानंतर विरोधक आक्रमक होतील, असा मुंबईकरांचा समज होता. पण काँग्रेस वगळता एकाही विरोधी पक्षाने तशी भूमिका घेतली नाही. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली विविध मुद्दय़ांवरून आंदोलने, मोर्चे काढण्यात आले; परंतु काँग्रेसमधील अंतर्गत कलहच या पक्षाला मारक ठरणार आहे. त्यामुळे केलेली आंदोलने, मोर्चे यांच्यातून काहीच फलित निघू शकले नाही. मुंबईत अनेक भागात काँग्रेसने आपल्या मतपेढय़ा जपल्या आहेत. या मतपेढय़ांच्या जोरावर काँग्रेसचे यश अवलंबून आहे.

 

अपुरा पाणीपुरवठा, वाढती अस्वच्छता, संपुष्टात आलेली कचराभूमींची क्षमता, कमकुवत होत असलेले मलनि:सारण वाहिन्यांचे जाळे, बकाल वस्त्या अशा अनेक समस्यांमुळे मुंबईकर हैराण आहेत. मुंबईकरांना नवे प्रकल्प देण्याबरोबरच या नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे काम पुढील पाच वर्षांमध्ये होणे गरजेचे आहे. शिवसेना आणि भाजपने मतदारांना भुलविण्यासाठी प्रचारादरम्यान अनेक घोषणा केल्या. पण या घोषणाबाजीतील त्रुटींबाबत बोलणे उभय पक्षांच्या नेत्यांनी टाळले. आपले मत देऊन पुढच्या पाच वर्षांसाठी नगरसेवक निवडून आणणाऱ्या मतदारांनी आपली जबाबदारी ओळखण्याची गरज आहे. निवडून दिलेले लोकप्रतिनिधी काम करीत नसतील तर त्यांच्याकडून ते करवून घेण्यासाठी मतदारांनी पुढे यायला हवे. तरच मुंबईचा विकास खऱ्या अर्थाने घडू शकेल.

..तर पाच वष्रे लाथाळ्यांमध्येच

  • मुंबईमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष आणि मनसे दुबळी बनली असून गेली २५ वर्षे मांडीला मांडी लावून सत्तास्थानी बसलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत होण्याची चिन्हे आहेत.
  • पालिकेमध्ये बहुमतासाठी ११४ नगरसेवकांची आवश्यकता आहे. सध्याची राजकीय स्थिती लक्षात घेता बहुमताच्या आकडय़ापर्यंत पोहोचण्यासाठी करिष्मा घडेल असे वाटत होते; परंतु तसे होताना दिसलेच नाही.
  • शिवसेना आणि भाजपचे नेते केवळ एकमेकांवर आगपाखड करण्यात रमले होते. या निवडणुकीत आकडय़ांच्या खेळावर सर्व काही अवलंबून असणार.
  • सध्याची राजकीय स्थिती पाहता एका पक्षाला बहुमत मिळणे अवघड आहे. पण बहुमत मिळाले तर एकहाती सत्ता स्थापून पालिकेचे प्रकल्प मार्गी लावता येतील.
  • मात्र पालिकेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास पुढची पाच वर्षेही भांडणे, लाथाळ्यांमध्येच जातील आणि मुंबईची स्थिती अधिकच बिकट होईल.

काँग्रेस, सपला एमआयएमचे आव्हान

गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत एक आमदार निवडून आल्यानंतर एमआयएमच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पालिका निवडणुकीत खाते उघडण्याची तयारी या पक्षाने केली आहे. एमआयएममुळे काँग्रेस आणि समाजवादी पक्षासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पालिका निवडणुकीत एमआयएमने अल्पसंख्यांकबहुल भागांत उमेदवार उभे केले आहेत. त्याचा फटका काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला बसण्याची चिन्हे आहेत. अल्पसंख्याक बहुल भागातील आपले पारंपरिक प्रभाग राखण्यासाठी या दोन्ही पक्षांकडून विशेष प्रयत्न झाल्याचे दिसले नाही. त्यामुळे पालिकेत एएमआयएमला खाते उघडण्याचा मार्ग मोकळा आहे.