पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत खासदारकी मिळविणाऱ्या गजानन कीर्तीकर यांचा उत्तर-पश्चिम मुंबई हा मतदारसंघ. २०१५च्या विधानसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे चूल मांडणाऱ्या सेनेला सहापैकी तीन जागा राखता आल्या. मात्र उर्वरित तीन जागा पटकावून भाजपने सेनेला धक्का दिला आहे. अर्थात त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची लाट कायम होती. परंतु, आता नोटाबंदीचा निर्णय आणि भाजपप्रणीत सरकारची सव्वा दोन वर्षांची कारकीर्द यामुळे महापालिका निवडणुकीत या पट्टय़ातून जास्त जागा जिंकण्यासाठी भाजपला पुन्हा ‘नमो’ करिश्मा घडण्याची आशा करावी लागणार आहे.

या मतदारसंघात येणाऱ्या ४३ प्रभागांपैकी गेल्या पालिका निवडणुकीत सेनेने २० तर भाजपला ६, काँग्रेस १२ आणि पाच जागा अपक्षांनी मिळविल्या. त्याआधी हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता. त्यामुळे त्याचे प्रतिबिंब दिसणे साहजिकच आहे. परंतु गेल्या लोकसभा निवडणुकीत कीर्तीकर यांना चार लाख ६४ हजार ८२० मते मिळाली ती सेना-भाजप युतीमुळे. विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यानंतर सेनेला पाच मतदारसंघात (वर्सोवा मतदारसंघात सेनेचा अधिकृत उमेदवार बाद झाल्याने) दोन लाख ६७ हजार ७५५ मते मिळाली. भाजपला सहा मतदारसंघात दोन लाख ९९ हजार १४५ मते घेता आली होती. परंतु भाजपची ही मते अर्थातच नरेंद्र मोदींच्या करिश्म्यामुळे होती. आता भाजपचे काही मोजके उमेदवार वगळले तर सर्व नवे चेहरे आहेत. उलट सेनेतील उमेदवार त्या तुलनेत तगडे आहेत. काँग्रेसने उमेदवारांची भरती केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यापैकी काही मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. परंतु त्यांचा प्रभाव फारसा दिसून येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस असून नसल्यासारखी आहे.

फेररचनेमुळे अंदाज कठीण

बहुसंख्येने मराठी, गुजराती, उत्तर भारतीय तसेच काही प्रमाणात ख्रिश्चन, पंजाबी, दक्षिण भारतीय अशा मतदारांचा हा प्रभाग. फेररचनेनंतर गेल्या निवडणुकीतील सर्वच प्रभाग बदलले आहेत. एकही प्रभाग पूर्वीसारखा नाही. दोन प्रभागातील काही भाग मिळून एक प्रभाग झाल्याने ठामपणे काही सांगणे या ठिकाणी कठीण आहे. विद्यमान २१ नगरसेवक पुन्हा आपले भवितव्य अजमावत असले तरी मतदार नवे असल्यामुळे तेही साशंक आहेत. मोहसीन हैदर, ज्ञानमूर्ती शर्मा, विष्णू कोरगावकर यांच्या पत्नींना तर संध्या यादव, स्मिता सावंत यांच्या पतींना उमेदवारी मिळाली आहे.

चुरशीच्या लढती

प्रभाग ६० मध्ये (लोखंडवाला संकुल- आरटीओ) स्थायी समितीचे अध्यक्ष शैलेश फणसे (शिवसेना) आणि ज्योत्स्ना दिघे (काँग्रेस) तर प्रभाग ६२ मध्ये (मोमीन नगर-बेहराम बाग-ओशिवरा) राजू पेडणेकर (शिवसेना) आणि चंगेश मुलतानी (काँग्रेस) या विद्यमान नगरसेवकांमधील लढती चुरशीच्या ठरणार आहेत. सेनेत आलेले काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते बाळा आंबेरकर (६८ – मोरागाव-सात बंगला) यांना भाजप आमदार अमित साटम यांचे मेव्हणे मोहन राठोड यांच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. प्रभाग ७० (इर्ला-आजादनगर-प्रेमनगर) येथे काँग्रेच्या विद्यमान नगरसेविका बिनिता वोरा यांच्यासमोर भाजपने कंपनी सेक्रेटरी असलेल्या सुनीता मेहता यांना उभे केले आहे. भाजपचे सक्रिय पदाधिकारी असलेल्या राजेश मेहता यांच्या त्या पत्नी आहेत. मेहता यांचा असलेला अफाट जनसंपर्क आणि आमदार साटम यांच्या कामामुळे भाजपला ही जागा हक्काची वाटत आहे. भाजपचे आपल्या मतदारसंघातील सर्व उमेदवार निवडून येतील, असा दावाच साटम यांनी केला आहे.

प्रभाग ६६ (फिदाई बाग-गावदेवी डोंगरी) मध्ये सेनेने तृतीय वर्ष विज्ञान शाखेत असलेल्या २१ वर्षे वयाच्या योगिता कशाळकर हिला उमेदवारी दिली आहे. येल्लपा कुशाळकर या शाखाप्रमुखाची ही कन्या. परंतु प्रभाग महिला झाल्याने कुशाळकर यांची संधी हुकली. मुस्लीमबहुल मतदारसंघात काँग्रेसच्या मेहेर हैदर उभ्या असल्या तरी एमआयएममुळे खरी लढत सेना-भाजप यांच्यात होईल. काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका वनिता मारूचा यांना ६७ क्रमांकाच्या प्रभागात (गुलमोहर – म्हाडा कॉलनी- चार बंगला- भवन्स कॉलेज) सेनेने जयवंत परब यांच्या भावाची सून प्राची परब यांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान नगरसेवक संजय पवार यांचा हा पूर्वीचा प्रभाग. सेनेची ही हक्काची जागा असल्यामुळे मारुचा यांना चुरशीची लढत द्यावी लागणार आहे. काँग्रेसचे माजी आमदार अशोक जाधव यांची कन्या अल्पा ही ६५ क्रमांकाच्या प्रभागातून (आंबोली-राम बाग-गिल्बर्ट हिल) नशीब अजमावत आहे. भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका उज्ज्वला मोडक यांना ७४ क्रमांकाच्या प्रभागातून उभ्या ठाकल्या आहेत. माजी नगरसेवक असलेले सुभाष सावंत (प्रभाग ८२- जे.बी.नगर-अशोकनगर) हे दुसऱ्यांदा नगरसेवक बनण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्या पत्नी गेल्या वेळी निवडून आल्या होत्या. तीच गत सुनील यादव (भाजप- प्रभाग ८० – एम.व्ही. कॉलेज-पारसी कॉलनी) यांची आहे. त्यांच्या पत्नी नगरसेविका होत्या. परंतु सावंत आणि यादव यांचा आपल्या प्रभागात चांगलाच वरचष्मा आहे.

यांचे भवितव्य ठरणार..!

स्थायी समितीचे अध्यक्ष शैलेश फणसे, पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते आणि आता शिवसेनेच्या तिकिटावर उमेदवारी लढविणारे बाळा आंबेरकर, राजू पेडणेकर, अनघा म्हात्रे, प्रमिला शिंदे, प्रवीण शिंदे, राजन पाध्ये, अनंत नर (शिवसेना); राम बारोट, उज्ज्वला मोडक, ज्योती अळवणी, विनोद शेलार, केशरबेन पटेल (सर्व भाजप); विनिता वोरा, किरण पटेल, वनिता मारुचा, विन्नी डिसुझा, सुषमा राय, चंगेश मुलतानी (काँग्रेस); रुपाली रावराणे (राष्ट्रवादी काँग्रेस).

कळीचे मुद्दे..

म्हाडा वसाहतींचा रखडलेला पुनर्विकास आणि त्यामुळे मोठय़ा संख्येने असलेल्या मध्यमवर्गीयांची होरपळ, वर्षांनुवर्षे प्रलंबित झोपु योजना, जुहू, वेसावे कोळीवाडय़ांना बसलेला सीआरझेडचा फटका, प्रचंड वाहतूक कोंडी, काही प्रभागात अपुरा पाणीपुरवठा आदी.

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले दिलीप माने यांच्या पत्नी निर्मला माने (प्रभाग ७५ – सेव्हन हिल्स-मरोळ-विजयनगर) यांना सेनेचे विद्यमान नगरसेवक प्रमोद सावंत यांच्या पत्नी प्रियांका यांचे आव्हान असेल. भाजपचे आमदार पराग अळवणी यांच्या पत्नी ज्योती अळवणी (प्रभाग ८५ -डहाणूकर कॉलेज- विलेपार्ले) रिंगणात आहेत. ५१ क्रमांकाच्या प्रभागामध्ये विद्यमान भाजप नगरसेवक आशीष शेलार यांना संभाजी ब्रिगेडचे संदीप जाधव यांचे आव्हान असेल. प्रभाग ८६ (आंतरराष्ट्रीय विमानतळ-सहार व्हिलेज) मध्ये विद्यमान नगरसेविका सुषमा राय आणि सेनेच्या पार्वती निकम यांच्यात जुंपणार आहे. राष्ट्रवादीला विद्यमान नगरसेविका रुपाली रावराणे यांच्या रूपाने (प्रभाग ३७ -कुरार व्हिलेज) एक जागा राखणेही कठीण होणार आहे.