निवडणुकीच्या आखाडय़ात पती-पत्नींची एकमेकांना साथ

महानगरपालिका निवडणुकीकरिता सर्वपक्षीय उमेदवार दिवसरात्र प्रचारात गुंतले असतानाच अनेकांना जोडीदाराचीही मोलाची साथ मिळते आहे. प्रचारफेरीत सहभागी होण्यापासून ते समाजमाध्यमांवरील प्रचाराची आघाडी सांभाळण्यापर्यंत अनेक कामांमध्ये त्यांचे जोडीदार हिरिरीने उतरले आहेत. पत्नी महिलांकरिता हळदीकुंकू, सहली आयोजित करून तर पती प्रचारफेऱ्यांकरिता कार्यकर्त्यांची जमवाजमव करून जोडीदारांच्या प्रचाराला हातभार लावत आहेत.

पालिका प्रचाराचा नारळ फुटल्यापासून सर्वपक्षीय उमेदवारांच्या ‘श्री’ आणि ‘सौ’ही प्रचाराच्या िरगणात उतरल्या आहेत. प्रभागातून निघणाऱ्या प्रचारफेरींपासून ते समाजमाध्यमे हाताळण्यापर्यंत अनेक जबाबदाऱ्या ते हाताळताना दिसतात. पतीच्या प्रचाराकरिता महिला बचत गट, भिशीचे गट यांमधील महिलांसाठी हळदीकुंकू अथवा महिला मेळावा अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात पत्नी पुढाकार घेत आहेत. तर काही जणी महिलांसाठी एकदिवसीय सहलींचे आयोजन करून आपल्या ‘श्रीं’च्या प्रचाराला हातभार लावत आहेत. एकविरा, शिर्डी अशा ठिकाणी या सहली छुप्या पद्धतीने आयोजित केल्या जात आहेत. तर हळदीकुंकू कार्यक्रमाचे औचित्य साधून त्या ठिकाणी नवऱ्याच्या भाषणाचा कार्यक्रम आयोजित करत आहेत. काही उमेदवारांच्या उच्चशिक्षित पत्नी समाजमाध्यमांची आघाडी सांभाळत आहेत. दिवसभर पतीची प्रचारफेरी कोणत्या विभागात होणार आहे, प्रचारफेरीची छायाचित्रे, भाषणांचे व्हिडीओ आदी माहिती समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्याचे काम त्या करतात.

उमेदवार महिला असल्यास त्यांचे पतीही प्रचाराला हातभार लावतात. भाषणाचे मुद्दे काढून देणे, प्रचाराकरिता कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करणे अशा अनेक जबाबदाऱ्या पती सांभाळत आहेत.

मला फारसा राजकारणात रस नाही, पण माझे पती निवडणुकीला उभे असल्याने समाजमाध्यमांतून मी त्यांचा प्रचार करत आहे. दिवसभर होणाऱ्या प्रचाराची माहिती आणि दुसऱ्या दिवसाचा प्रचार कुठे होणार आहे, याची माहिती मी माझ्या ‘फेसबुक’वर टाकते.

मानसी करंदीकर, मनसे उमेदवार वैभव करंदीकर यांच्या पत्नी.

गेल्या निवडणुकीला मी उभी राहिले होते आणि त्या वेळी माझ्या पतींनी माझ्या प्रचारासाठी भरपूर मेहनत घेतली होती. यंदाच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या प्रचाराची जबाबदारी मी सांभाळते आहे.

ज्योती म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार जितेंद्र म्हात्रे यांच्या पत्नी.

मी गेली पाच वष्रे नगरसेवक म्हणून कार्यरत होतो. त्या वेळेस माझी पत्नी माझ्यासोबत राजकारणात सक्रिय होती. माझ्यासोबत सभांना, प्रभागाच्या फेरीला ती उपस्थित असायची. आता तिला उमेदवारी मिळाल्याने कार्यकर्त्यांची जमवाजमव करण्यात मी तिला मदत करतो.

वीरेंद्र तांडेल, मनसे उमेदवार भारती तांडेल यांचे पती.